केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामाल

मी जळगाव बाजार समितीच्या तत्कालीन सभापतिंना केळीची कमी दरात खरेदीचा प्रकार लक्षात आणून दिला. मध्यंतरी खरेदी पावत्यांसह केळी उत्पादकांची लूट झाल्याचे समोर आणले. पण बाजार समितीने एकही कारवाई केली नाही. हा प्रकार किती दिवस चालेल, हा माझा प्रश्‍न आहे. - संजय चौधरी, शेतकरी, खेडी खुर्द (जि. जळगाव)
केळी
केळी

जळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात, त्यापेक्षा क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये कमी दरात म्हणजे सहा रुपये किलोने खरेदी करून केळी पिकवणी केंद्रचालक याच केळीची आपापल्या भागात किमान २५ रुपये किलो दरात विक्री करीत आहेत. रोज किमान सहा हजार क्विंटल केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी केली जाते. केळी उत्पादकांची प्रतिदिन सव्वा कोटी रुपयांची लूट मध्यस्थांच्या लॉबीला हाताशी धरून विविध शहरांमध्ये बसलेले केळी पिकवणी केंद्रचालक, व्यापारी करीत आहेत. जूनमध्ये केळीवर निपाह विषाणू आल्याची अफवा पसरवून आणखी लूट केली. छत्तीसगड, नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, राजस्थानमधील केळी पिकवणी केंद्रचालकांनी जळगाव जिल्ह्यातील मध्यस्थांच्या माध्यमातून केळीची ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही मध्यंतरी खरेदी केली. बाजार समित्या, प्रशासनाने कारवाईचे कोणतेही अस्त्र उगारले नाही. रोज सहा हजार क्विंटल केळीची किमान २०० रुपये कमी दरात खरेदी करून प्रतिदिन किमान सव्वाकोटी रुपयांचा चुना या पिकवणी केंद्रचालकांनी शेतकऱ्यांना मध्यस्थांच्या माध्यमातून लावल्याचे समोर येत आहे. आता श्रावणमासातही हा प्रकार सुरू आहे. फक्त दर्जेदार केळी उत्पादकांना जे दर जाहीर होतात, तेवढे दर मिळत आहेत. परंतु, इतरांची सर्रास कमी दर देऊन लूट सुरू आहे. मध्यस्थांची मोठी लॉबी बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) व जळगावात सक्रिय आहे. प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून ही लुटालूट सुरू असल्याचे केळी जिल्ह्यातील बाजारातील जुन्या जाणत्यांचे म्हणणे आहे. याच लॉबीने सहकारी फ्रूट सेल सोसायट्यांचा व्यापार ठप्प करून आपली मक्तेदारी निर्माण केल्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.  दर्जाचे कारण  ही केळी कमी दर्जाची असल्याचे सांगून शेतकऱ्यांना जे दर रावेर बाजार समिती जाहीर करते, त्यापेक्षा कमी दर दिले जात आहेत. केळी थेट शेतातून ट्रकमध्ये क्रेटमध्ये भरली जाते. जळगाव, रावेर भागातून १२ तासांच्या अंतरावर असलेल्या भागात ही केळी पोचविली जाते. कारण १२ तासानंतर या केळीचा दर्जा आणखी घसरण्याची शक्‍यता असते. मग त्याचा फटका केळी पिकवणी केंद्रचालकाला बसतो. मुंबई, पुणे, नागपूर, राजस्थान, छत्तीसगड, ठाणे, कल्याण येथे ही केळी पाठविली जात आहे. तेथे ती थेट केळी पिकवणी केंद्रात ठेवली जाते. मध्यस्थांना एका ट्रकमागे (१५ मेट्रिक टन) अडीच ते तीन हजार रुपये कमिशन दिले जाते. तर एक टनामागे १२०० रुपये वाहतूक भाडे या केळी पिकवणी केंद्रचालकांना लागते.  फक्त चमकोगिरीसाठी दरांबाबत बैठका केळीची कमी दरात खरेदीचा मुद्दा मागील चार पाच वर्षे चर्चेत आहे. त्यावर तोडगा म्हणून चोपडा बाजार समिती कांदेबाग केळीचे रोज स्वतंत्र दर जाहीर करील व त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना जेवढे दर जाहीर होतील, तेवढे मिळवून दिले जातील, असा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. जळगाव बाजार समितीनेही बिगर नोंदणीकृत व्यापाऱ्यांना दंड करू, कमी दरात खरेदी करणाऱ्या मध्यस्थांना पकडण्यासाठी पथके कार्यरत राहतील, असे म्हटले होते. मध्यंतरी यावरून मोठा गोंधळ जळगाव बाजार समितीत झाला होता. पण एकही कारवाई कमी दरात केळी खरेदीसंबंधी जळगाव बाजार समितीने मागील चार - पाच वर्षांत केलेली नसल्याची माहिती मिळाली. मग बाजार समित्या व खरेदीदारांची एकी आहे की काय, अशी शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केली आहे. बऱ्हाणपूरच्या दरांचे दाखले बऱ्हाणपूर येथील बाजारात ४०० रुपये प्रतिक्विंटलपासून केळीची खरेदी सुरू आहे. जूनपासून हा प्रकार तेथे सुरू असून, याचा आधार घेऊन जळगाव जिल्ह्यातील मध्यस्थ जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, जळगाव येथे कमी दरात केळीची खरेदी करतात. अनेकदा दर्जेदार केळीलाही पुरेसे दर देत नाहीत. केळी नाशवंत असल्याने दोन दिवसही घड कापणी रखडली तर मोठे नुकसान होते. याचा फायदा मध्यस्थ, व्यापारी एकी करून अधिकचा उचलत आहेत.  प्रतिक्रिया जे दर केळीला जाहीर होतात, त्यापेक्षा कमी दरात खरेदी व्हायला नको. बाजार समित्यांनी दरांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण बाजार समिती स्वायत्तपणे यासंबंधी काम करते. परंतु, असे असले तरी आमच्याकडे पुराव्यानिशी कमी दरात केळी खरेदीची माहिती दिली तर संबंधित व्यापारी व दोषींवर थेट फौजदारी कारवाई करू.  - विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com