बोंड अळीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक

बोंड अळीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक
बोंड अळीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; मात्र शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याचा मुद्दा मांडत भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी बोंड अळीचा प्रश्न वेगळा असताना तो गारपिटीत समाविष्ट करून सरकारकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत विधानसभेचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे विधानसभेचे बुधवारी (ता. २८) कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नियम ९७ अन्वये प्रस्ताव मांडत बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली; मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांच्या मागणीला सुरवातीला नकार दिला. त्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्याने दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या वेळी भाजप आमदार अनिल बोंडे यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका करत विरोधकांनो, विरोध करण्यासाठी टॉनिक घेऊन येत जा, असे म्हणत विरोधकांना डिवचले. या वेळी हरकतीचा मुद्दा घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधकांच्या नियम ९७ अन्वये चर्चा करत प्रश्नोत्तराचा तास रद्द करा, अशी मागणी केली होती. म्हणून तुम्ही प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावावर चर्चा करा, त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, “तुम्ही चर्चेची मागणी केली, त्यावर मी चर्चा सुरू केली आहे. तुम्ही खाली बसा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा सुरू आहे. तुम्ही ऐकून घ्या. जाग्यावर बसा. अनिल बोंडे तुम्ही प्रस्तावावर चर्चा सुरू करा. ’’ भाजप आमदार अनिल बोंडे म्हणाले, “विरोधकांचे शेतकऱ्यांवरचे प्रेम किती ढोंगी आहे ते कळते आहे. शेतकरी प्रश्नांवर चर्चा सुरू असताना ते गोंधळ घालत आहेत. विरोधक वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यामुळे ते गोंधळ घालत आहेत. या वेळी राज्य सरकारने एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचा दावा केला. त्यावर विरोधकांनी गारपिटीसोबतच बोंड अळीवरही चर्चा करण्याची मागणी केली.’’ दरम्यान, तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याप्रश्नी अध्यक्षांच्या दालनात विरोधकांसोबत बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी विनंती तालिका अध्यक्ष योगेश सागर यांना केली. त्यानुसार योगेश सागर यांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. अखेर सत्ताधारी आणि विरोधकांचे दोन वेगवेगळे प्रस्ताव एकत्रित करून त्यावर आज (गुरुवारी) चर्चा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com