विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात निदर्शने केली
विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात निदर्शने केली

मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच विरोधकांनी ‘‘आयाराम गयाराम, जय श्रीराम’’च्या घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला. तसेच ‘विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग’, ‘आले रे आले चोरटे आले’ असे म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. १७) विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केल्याचे दिसून आले. 

गेली साडेचार वर्षे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने पक्षात घेतले. नगरमधून डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपच्या तिकिटावर निवडूनही आले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचा औपचारिक प्रवेश होणेच बाकी होते. जो झाल्यानंतर रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. ते सोमवारी विधिमंडळात प्रवेश करीत असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा दिल्या. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रिपद देणे योग्य आहे का असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाचा रोख राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळालेल्या मंत्रिपदावर होता. तसेच त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचीही मागणी केली. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच झाली आहे असे स्पष्ट केले.

त्यानंतर विधानसभेत दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभेचे आजीमाजी सदस्य हनुमंत डोळस, तात्यासाहेब उर्फ आर. ओ. पाटील, पांडुरंग हजारे यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले. 

त्याआधी दोन्ही सभागृहांत या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. तसेच दोन्ही सभागृहांत राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उईके, तानाजी सावंत या कॅबिनेट मंत्र्यांचा तर योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय भेगडे, परिणय फुके, अतुल सावे या राज्यमंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला.

आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीविषयी संशय ः धनंजय मुंडे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. देशाच्या विकासदराचा आकडा फुगवून सांगितलेला असून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप देशातल्या १०८ अर्थतज्ज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञानी नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे असे श्री. मुंडे यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीविषयी संशय आहे, असे ते म्हणाले.

त्यापूर्वी कामकाज सुरू होताच भाजपचे पृथ्वीराज देशमुख या नवनियुक्त सदस्यांचा शपथविधी झाला. तसेच तुकाराम माताडे आणि पांडुरंग हजारे या माजी विधान परिषद सदस्यांच्या निधनाबद्दलच्या शोकप्रस्तावावर सभापती, विरोधी पक्षनेत्यांसह अन्य पक्षांच्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दोन्ही सदस्यांना श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com