दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक राहणार याची चुणूक सोमवारी (ता. १९) पहिल्याच दिवशी दिसून आली. कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि नंतर सभागृहात विरोधकांनी या मुद्द्यांवर राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत विधानभवन आवार दणाणून सोडले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजांच्या आरक्षणाची मागणी तसेच दुष्काळी मदत म्हणून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी विरोधकांनी केली. कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे निषेध आंदोलन केले. याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात प्रवेश करत होते. ही संधी साधत विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार या वेळी उपस्थित होते. मराठा सामाजाला देण्यात येणारे आरक्षण हे कोर्टात टिकणारे असले पाहिजे त्यासाठी हे आरक्षण ओबीसींमध्ये उपप्रवर्ग तयार करून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी केली. विखे पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी रविवारी वेगळ्या प्रवर्गाबाबत जे विधान केले आहे, त्यामुळे हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही असे वाटते. गेल्या सरकारनेही असाच प्रयत्न केला मात्र, ते कोर्टात टिकू शकले नाही. ओबीसीमध्ये उपप्रवर्ग तयार करून जर सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका घेतली तर ते न्यायालयात टिकेल. अन्यथा या विरोधात कोणी कोर्टात गेल्यास सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे ओबीसींमध्ये प्रवर्ग निर्माण करून आरक्षण द्यावे अशी मागणी आहे, असेही विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मागास आयोगाच्या ज्या शिफारशी सांगितल्या आहेत त्यावरून असे दिसते, की ग्रामपंचायत निवडणुकीपासून स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाच्या तरुणांना संधी मिळू शकणार नाही. त्यामुळे सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा. सरकारने ओबीसींमधील नव्या प्रवर्गातून १६ टक्केच काय २२ टक्क्यांपर्यंत आरक्षण द्यावे, त्याला आमचा विरोध नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, की हिवाळी अधिवेशन सुरू होणार असताना मुख्यमंत्र्यांनी त्याआधीच मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारल्याचे जाहीर केले. तो अहवाल काय आहे, हे आम्हा विरोधकांना माहिती नाही. यावर शासनाचे काय म्हणणे आहे, विरोधकांच्या काय भावना आहेत यावर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते. त्यानंतर या संदर्भातील घोषणा व्हायला हवी होती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  दुष्काळाची घोषणा होऊन २२ दिवस झाले तरी उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत. मागणी करूनही पिण्याचे पाण्याचे टँकर्स, दुष्काळग्रस्तांच्या हाताला काम मिळत नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. कोरडवाहू शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागायतदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत द्यावी, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच राज्य शासनाने चालू अधिवेशनातच मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणाची विषय मार्गी लावावा, अशी मागणी लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  त्यानंतर सभागृहातही विरोधकांनी दुष्काळी मदत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले. पटलावर शासकीय कामकाज मांडले जात असताना विरोधकांनी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिवंगत व्यक्तींचा शोकप्रस्ताव मांडला. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनाही यावेळी आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.  दरम्यान, भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा स्वीकारल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

आरक्षणावर बुधवारी सुनावणी मराठा आरक्षणावर येत्या बुधवारी (ता. २१) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे मांडावे, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा यासाठी विनोद पाटील यांनी सोमवारी सकाळी हायकोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करून घेऊन न्या. धर्माधिकारी आणि न्या. कोतवाली यांच्या कोर्टाने यावर २१ नोव्हेंबर रोजी (बुधवारी) सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com