संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ शोभेचे

`एनआरसीसी’कडे छाटणीकामी असलेल्या सयंत्रासाठी तीन महिन्यांपासून पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर हे सयंत्र उपलब्ध करून देण्यात आले. छाटणीची नियोजित वेळ हुकल्यास याचा कोणताही उपयोग होत नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडील सयंत्राचे ब्लेड तुटल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारची अनास्था संशोधन संस्थांच्या स्तरावर असल्याने यातून संत्रा बागायतदारांचे हित कसे साधले जाणार. यंत्र महागडे असल्याने ते शेतकऱ्यांना घेणेदेखील शक्‍य नाही. - रमेश जिचकार, संत्रा बागायतदार, अमरावती
संत्रा बाग छाटणी यंत्र
संत्रा बाग छाटणी यंत्र

नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था (एनआरसीसी) अपयशी ठरत आहे. आता ‘एनआरसीसी’कडून बाग छाटणीसाठी असलेल्या मशिनसाठीदेखील शेतकऱ्यांना महिनोमहिने ताटकळत ठेवण्यात येत असून हे सयंत्र शोभेपुरतेच ठरत असल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून ५५ लाख रुपयांची ही मशिन १०० टक्‍के अनुदानावर पुरविण्यात आली आहे.  राष्ट्रीय फलोत्पान मंडळाकडून नागपूरातील केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था तसेच अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या दोन्ही संस्थांना संत्रा बाग छाटणी सयंत्राचा पुरवठा करण्यात आला आहे. या मशिनच्या माध्यमातून बागेची शास्त्रोक्‍त पद्धतीने छाटणी होते. त्यामुळे विदर्भातील संत्रा बागायतदारांकडून या सयंत्राला मोठी मागणी आहे. परंतु `एनआरसीसी’ कडून हे यंत्र वापरास देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा बागायतदारांचा आरोप आहे.  नोंदणी नंतर महिनोमहिने हे यंत्र उपलब्धच करून दिले जात नाही. त्यामुळे छाटणीची शिफारसीत वेळ निघून जाते. विशेष म्हणजे नागपूर जिल्हयापेक्षा अमरावती जिल्ह्यात संत्रा लागवड क्षेत्र अधिक असल्याने हे सयंत्र अमरावती येथे उपलब्ध करून द्यावे, अशी बागायतदारांची मागणी आहे. परंतु त्याकडेही शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे.  असा होतो खर्च संत्रा बागेच्या छाटणीकामी ‘एनआरसीसी’कडून वापरासाठी देण्यात येणाऱ्या मशिनसाठी डिझेलचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. छाटणीचे काम जितके दिवस चालेल तितके दिवसपर्यंत मशिनचा चालक व सोबतचे दोन तज्ज्ञ यांचे राहणे व जेवणाचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. या संदर्भाने केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

प्रतिक्रिया छाटणी यंत्र सुमारे ६-७ वर्ष जुने आहे. त्यामुळे ते नादुरुस्त असण्याची शक्‍यता आहे. संत्रा बागायतदारांची बाग छाटणी यंत्राची मागणी लक्षात घेता नव्याने दोन सयंत्राच्या खरेदीची प्रक्रिया चालविली आहे. त्यानंतर एक काटोल व एक नागपूर येथे संत्रा बागायतदारांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. - डॉ. डी. एम. पंचभाई, विभाग प्रमुख (उद्यानविद्या), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com