संत्र्याची मोठी फळगळ, ८५ कोटींचे नुकसान

संत्र्याची मोठी फळगळ
संत्र्याची मोठी फळगळ

अमरावती : संत्रा उत्पादकांमागील संकटांचे शुक्‍लकाष्ठ संपता संपत नसून धुके, वायबहार आणि बदलत्या हवामानाचा फटका पिकाला बसल्याने मोठी फळगळ झाली आहे. शेतकऱ्यांचे ८५ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  पावसाळा संपल्यानंतर तीन दिवस अधिक तापमान, पावसाचा खंड; तसेच धुके, वायबहार अशा अनेक कारणांमुळे आंबिया बहारातील फळगळ होऊ लागली. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामध्ये अकोट, तेल्हारा, अंजनगाव या भागातील संत्राबागांचा समावेश आहे. या वर्षी आंबीया बहारातील संत्राफळांची उत्पादकता चांगली होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार हंगामाच्या सुरवातीलाच बागा पाहून व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये करार झाले. त्यापोटी सरासरी पाच लाख रुपयांची अडव्हॉन्स रक्‍कमदेखील दिली गेली. १५ ते २० लाख रुपयांत सौदे झाले. आता फळगळ, पाण्याअभावी फळांचा आकार नसणे आणि वायबहार यामुळे हेच व्यवहारातील रक्‍कम कमी केली जात आहे. २० लाख रुपयांचा सौदा केवळ २ ते ३ लाख रुपयांवर आले आहेत. अशाप्रकारे सुमारे ७५ ते ८५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान राष्ट्रीय लिंबूवर्गीय संसोधन संस्था तसेच कृषी विद्यपीठाची कोणतीच यंत्रणा या संदर्भाने मार्गदर्शनासाठी पोचली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या दोन्ही संस्थेबद्दल बोलताना तीव्र नाराजी व्यक्‍त केली. अमरावती सोबतच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील संत्रा फळगळीमुळे त्रस्त केले आहे. 

फळगळमुळे उत्पादकतेवर परिणाम झाल्याने १५ लाखांत व्यवहार झाला असेल तर शेतकरी आणि व्यापारी बसून सामंजस्याने हा व्यवहार दहा ते १२  लाखांवर आणत आहेत. शेतकऱ्यांनादेखील उत्पादकता कमी झाल्याची जाणीव असल्याने तेदेखील यास सहज तयार होत आहेत. यामध्ये व्यापारी आणि शेतकरी अशा दोघांचेही नुकसानच आहे. दोन महिने पाऊस नव्हता. त्यानंतर पाऊस आला असला तरी त्याआधी तापमानात वाढ झाली. धुके, उष्णता यामुळे संत्रे ‘बॉईल’ झाले. त्याचा फटका बसत आंबीया बहारातील फळे गळू लागली. परिणामी, २० लाख रुपयांत दिलेला बगीचा ३ लाख रुपयांत विकावा लागला. आता वायबहारामुळे फळांचा आकारदेखील वाकडा तिकडा व लहान झाला आहे. त्यामुळे सर्व होत्याचे नव्हते झाले. - मधुकर नाकट,  शेतकरी, अचलपूर, अमरावती

शेतकऱ्यांमध्ये आहे प्रचंड रोष राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे वरिष्ठ तज्ज्ञांना फिल्डवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यापासून रोखतात, अशी माहिती समोर आली आहे. हा प्रकार धक्‍कादायक असून याप्रकरणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करण्याचे प्रस्तावित आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तर अस्तित्वच आम्हा संत्रा उत्पादकांना कधी जाणवले नाही, अशी परिस्थिती आहे. अचलपूर येथील तहसीलदारांनादेखील याविषयी निवेदन दिले; परंतु शासनानेदेखील अद्याप दखल घेतली नाही.  - रमेश जिचकार संत्रा उत्पादक संघ, कार्याध्यक्ष 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com