गतवर्षीचे सोयाबीन अनुदान वितरित करण्याचे आदेश

गतवर्षीचे सोयाबीन अनुदान वितरित करण्याचे आदेश

परभणी : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला जाहीर करण्यात आलेले प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून १०८ कोटी ६४ लाख २९ हजार रुपये निधी उपलब्ध देण्यात येत आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबर २०१७ पूर्वी अनुदान वितरित करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली होती. त्यामुळे १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत अाडत व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे २५ क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर राज्य शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेले अनुदान वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या ३१ आॅक्टोबरपूर्वी अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गतवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गतच्या अाडत व्यापाऱ्यांकडे जिल्ह्यातील १५ हजार ५६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६३ हजार ३७६ क्विंटल सोयाबीनची विक्री केली होती. त्यानंतर या शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समितीकडे अनुदानासाठी आवश्यक अर्ज, सोयाबीन विक्री केलेली पावती, बॅंक पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केले होते. या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपये एवढा निधी आवश्यक आहे.

जिल्ह्यातील बाजार समितीनिहाय पात्र शेतकरी, कंसात अनुदान निधी ः परभणी २,४८४ (९०,१२,००० रुपये), जिंतूर २,८८४० (९९,९६,६९२ रुपये), बोरी १,५६२ (५१,८२,८०० रुपये), सेलू २,६१९ (७८,८६,१७० रुपये), मानवत १,७४७ (४८,२६,६९० रुपये), पाथरी १,०४३ (३५,६१,००० रुपये), सोनपेठ ३२९ (१२,१९,२२२ रुपये), गंगाखेड ५०४ (१,६०,००,६६४ रुपये), पालम १३५ (५,३१,७८६ रुपये), पूर्णा १,३८२ (५०,९३,३४८ रुपये), ताडकळस ९२३ (३७,६४,७३० रुपये).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com