शेतीपंपाच्या थकबाकी वसुलीचे आदेश

शेतीपंपाच्या थकबाकी वसुलीचे आदेश
शेतीपंपाच्या थकबाकी वसुलीचे आदेश

सोलापूर : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खरीप हातचा गेला आहे. आता रब्बीबाबतही आशा दुरावल्या आहेत. उरलेल्या दिवसातही पाऊस पडण्याबाबत खात्री नसताना महावितरणने शेतकऱ्यांकडील शेतीपंपाच्या थकबाकीची वसुली मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी तातडीने बिले भरावीत, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशाराही दिला आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने खरीप आणि रब्बीत शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पावसाने सलग तीन-साडेतीन महिने ओढ दिल्याने विहिरी, बोअरची पाणी पातळी पुरेशा प्रमाणात वाढलेली नाही. सुरवातीला झालेल्या एक-दोन पावसावरच पेरण्या उरकल्या. पण ही पिकेही पाण्याअभावी आता वाया गेली आहेत. त्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत अाहे. अशावेळी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा देऊन महावितरण जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांकडे शेतीपंपाची सुमारे ३१००कोटी रुपयांची थकबाकी आहे. वास्तविक, बिले भरण्याचाही काही मुद्दा नाही, पण उत्पन्नच नाही, तर बिले भरायची कशी? हा प्रश्‍न आहे. गेल्या वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सरकारच्या आदेशाने महावितरणने शेतकऱ्यांकडून सवलतीच्या नावाखाली जोरदार वसुली केली. त्याचपद्धतीने आताही वसुलीचा प्रयत्न आहे. सध्या महावितरणमध्ये या वसुलीसाठी तयारी सुरू आहे. खास पथके करून तालुकापातळीवरून ही वसुली मोहीम सुरू होणार आहे.

आधी भारनियमन, आता वसुली गेल्याच आठवड्यात शेतीसाठीचा दिवसाचा वीजपुरवठा आठ तासावरून सहा तासांवर आणण्यात आला आहे. शिवाय त्याच्या वेळाही बदलल्या आहेत. शेतकरी एकीकडे या परिस्थितीशी दोन हात करीत असताना आता थेट त्यांच्या थकबाकी वसुलीची मोहीम राबवून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com