दुष्काळात रोजगार देणारी कामे सुचविण्याचे आदेश

बीड दुष्काळ
बीड दुष्काळ

पुणे : गंभीर दुष्काळाची गावे अद्याप जाहीर झालेली नसली तरी यंदा ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे मजुरी देणारी कामे सुचविण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेले आहेत.  राज्याच्या मृद् व जलसंधारण विभागामार्फत जिल्हास्तरीय कामांबाबत आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कृषी आयुक्तालयातील जलसंधारण संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडून दुष्काळात रोजगार निर्मिती करणाऱ्या कामांच्या नियोजनाचा सध्या आढावा घेतला जात आहे. ‘‘कपार्टमेंट बंडिंग, ग्रेडर बंडिग, सीसीटी व शेततळ्याची कामे दुष्काळी स्थितीत वाढविता येतील. यामुळे ग्रामीण भागात अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजुरांना कामे मिळतील व कामांचा लाभ भविष्यात पिकाच्या उत्पादनवाढीला देखील होईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.  दुष्काळी स्थितीबाबत राज्यात सध्या महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात नुकसानीचे अंदाजित प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास मध्यम आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असल्यास गंभीर दुष्काळ जाहीर केला जाणार आहे. दुष्काळी स्थिती जाहीर होताच विविध उपाययोजनांपैकी रोजगाराची हमी देणारी कामे उपलब्ध करून देणे ही एक मुख्य जबाबदारी शासनाकडे येणार आहे. त्यामुळे सुरवातीपासून मजूर निर्मिती करणाऱ्या कामांचे आराखडे तयार करण्याकडे मृदसंधारण विभागाचा कल आहे.  ‘‘जलयुक्त शिवारातून शेततळे खोदाईला सव्वादोन लाखांपर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी होणारी तीन मीटरची खोदाई बहुतेक ठिकाणी यंत्राच्या साह्याने होते. मात्र, एक मीटरपर्यंतची खोदाई मजुरामार्फत करण्याची तरतुद मूळ योजनेत आहे. त्यामुळे एक मीटर खोदाई मजुराकरवी व दोन मीटर खोदाई यंत्राकडून झाल्यास शेतकऱ्यांची संख्या वाढेल आणि हातांना कामदेखील मिळेल,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यात सध्या मजुरांच्या माध्यमातून तळ्यांच्या खोदाईला प्रतिसाद वाढला आहे. जलयुक्त शिवारातून दुष्काळात कामे वाढविल्यास जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणारी आणि पाणी मुरवणारी कामे मोठ्या प्रमाणात करता येतील. त्याचा लाभ पुढील खरीप व रबी हंगामाला होईल, असा अंदाज जलसंधारण विभागाचा आहे.  दुष्काळी स्थिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना देखील गती देता येईल, असे सांगण्यात आले. रोजगार हमी योजनेतून २६० कामांचे एकत्रिकरण करण्यास मान्यता आहे. यात बंधारा, माती धरण, स्टॉप डॅम, चेकडॅम, सीसीटी, समपातळी बांध, गॅबियन स्ट्रॅक्चर, बोल्डर चेक, कालवा नुतणीनकर, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड व फळबाग लागवड, कुरण विकास, बांबू लागवड याशिवाय सरकारी जमिनींच्या विकासाची कामे देखील करता येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com