मुंबई येथे क्रांतिदिनी शेतकरी परिषद

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतान रघुनाथदादा पाटील
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतान रघुनाथदादा पाटील

जवळगाव, जि. बीड  : येत्या क्रांतिदिनी ९ ऑगस्टला मुंबई येथे शेतकरी परिषद घेण्याची घोषणा शेतकरी संघटना व सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या जवळगाव येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. ३ सप्टेंबरला पंढरपूर येथे शेतकरी मेळावा घेण्याचेही बैठकीत ठरले.

जवळगाव येथे सोमवारपासून (ता. २५) सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठक व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा मंगळवारी (ता. २६) समारोप झाला. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, बळिराजा शेतकरी संघाचे गणेशकाका जगताप, ‘जनमंच’चे उपाध्यक्ष अमिताभ पावडे, शेतकरी महिला आघाडीच्या विमल आकणगिरे, रंजना नांदखिले, सुशीलाताई मोराळे, सुकाणू समितीचे सदस्य सुभाष ठाकरे, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, कष्टकरी संघाचे सुभाष काकुस्ते आदी उपस्थित होते.

यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, की राज्य कुणाचे आहे हे महत्त्वाचे नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे राजकारण व्हायला नको. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी शेतकरीविरोधी कायदे मोडीत काढून शेतकरीहिताची धोरणे अंगीकारायला हवी. वर्षानुवर्षं आयात- निर्यातीसंदर्भातील बदलाबाबत ठोस निर्णय घेतले जात नाहीत. सरकारच कायद्याचे पालन करीत नाही. त्यामुळे संकटाचा सामना करावा लागलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो आहे. शहरातील ग्राहक शेतकऱ्यांसाठी काही करू शकतो का, याविषयीची भावनिक साद मुंबईत होणाऱ्या शेतकरी परिषदेच्या माध्यमातून घातली जाणार आहे.

त्यासाठी येत्या काळात शेतकरी संघटनेच्या मजबूत बांधणीसोबतच राज्यभरात मुंबईतील शेतकरी परिषदेविषयी जागराचे काम हाती घेतले जाईल. गावातून मुंबईत गेलेल्या व्यक्‍तींच्या सहकार्यातून मुंबईची परिषद यशस्वी केली जाईल.  सर्वच मोठ्या शहरांत असा जागर करीत तन, मन, धनाने शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन करून राज्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ३ सप्टेंबरला पंढरपूर येथे शेतकरी मेळावा व ऊस परिषद घेतली जाईल. त्यामध्ये ऊस एफआरपी, इतर शेतीमालाचे हमीभाव, शासनाने जाहीर केलेला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्‍के नफा मिळवून देणारे दर याविषयी चिंतन होईल. या प्रशिक्षणात ३०० ते ३५० प्रतिनिधींनी सहभाग नोंदविल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी  दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com