गुलाबी बोंड अळीच्या डंखामुळे कापूस कवडीमोल

गुलाबी बोंड अळीच्या डंखामुळे कापूस कवडीमोल

परभणी : जिल्ह्यात सद्यःस्थितीत बागायती क्षेत्रातील कपाशीचे पीक भरपूर पाते, फुले, बोंडे लगडल्यामुळे बहारात दिसत आहे; परंतु गुलाबी बोंड अळीच्या डंखामुळे झाडावरील सर्व बोंडे बाधित झाली आहेत. बोंडे फुटली तरी नख्यामधील कवडी झालेला कापूस वेचताना त्रास होत आहे. कवडी कापसाला चांगला दर मिळण्याची सुतराम शक्यता नाही.   त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवला असून, अनेक जण कपाशी मोडून अन्य पिके घेण्याच्या तयारीत आहेत.

आधीच कवडीमोल झाल्यामुळे यंदा सिंचनासाठी पाणी असले तरी फरदड कपाशीचे उत्पादन कमी होणार आहे. बीटी कपाशीचे आगमन झाल्यानंतर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीने कपाशीच्या पिकाची नासाडी केली आहे. सुरवातीच्या बहाराच्या बोंडापासून एकरी ३ ते ४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे; परंतु त्यानंतर लागलेल्या बहाराच्या बहुतांश बोंडांना गुलाबी बोंड अळीने डंख मारला आहे.

परिपक्व झालेली बोंडे फुटत आहेत. अळीच्या डंखामुळे कापूस नख्यामध्येच चिकटून राहिला आहे. नख्यामध्ये कवडी झालेला कापूस वेचताना मजुरांना त्रास होत आहे. सुरवातीला वेचणीसाठी ६ ते ८ रुपये प्रतिकिलो असलेले दर आता १० ते १२ रुपये किलोपर्यंत झाले आहेत; परंतु तरीही मजूरवर्ग वेचणीस तयार नाही. वजनाप्रमाणे कापूस वेचणी परवडत नाही. त्यामुळे १२५ ते १५० रुपये रोजंदारीप्रमाणे वेचणी करू, असे मजूर सांगत आहेत.

ग्रामीण भागात सध्या चांगल्या दर्जाच्या कापसाचे दर ३,८०० ते ४,३०० रुपयेपर्यंत आहेत. बोंड अळीच्या डंखामुळे कापसाचा धागा तुटला असून, लांबी कमी झाली आहे. वेचणी केलेल्या कापसामध्ये कवडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाजार भाव कमी मिळणार आहेत. यापुढील वेचण्यानंतर कवडीच्या प्रमाणात आणखी वाढ होणार आहे. कवडी कापसास दरदेखील चांगले मिळणार नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी कपाशीचे पीक मोडून उन्हाळी पिकांसाठी रान मोकळे करत आहेत.

प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीवर यंदा गुलाबी बोंड अळीचा घाला आला आहे. जिरायती क्षेत्रावरील कपाशीचा हंगामात एकाच वेचणीत आटोपला आहे. बागायती कपाशी हिरवी दिसत असली तरी एकही बोंड धड नाही. यंदा कवडीमोल झालेल्या कापसामुळे लागवड खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र कोलमडले आहे.

दहा एकर कापूस आहे. आजवर जेमतेम ४० क्विंटल कापूस घरी आला आहे. सध्या झाडाला ५० ते ६० बोंडे असली तरी किडीकी आहेत. कवडीचे उत्पादन घेऊन उपयोग नाही. यंदा मोठा घाटा झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी अजिबात कापूस लावायचा नाही. - रावसाहेब देशमुख, शेतकरी, मारवाडी, ता.जिंतूर, जि. परभणी.

अडीच एकरामध्ये ६ क्विंटल कापूस निघाला आहे. आता कापसाचे पीक पाते, फुले, बोंडांनी लदबदून गेले आहे; परंतु एकही बोंड धड नाही. कवडीमुळे मजूर वजनावर वेचणी करायला तयार नाहीत. बोंड अळीमुळे यंदा पहिल्यादांच बीटी कपाशीचे नुकसान झाले आहे. - माणिकराव सूर्यवंशी, शेतकरी, सिंगणापूर, जि. परभणी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com