पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात भात लागवड सुरू

भात लागवड वेगात
भात लागवड वेगात

पुणे  : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरवात केली आहे. येत्या आठवड्यात या लागवडीस आणखी वेग येण्याची शक्‍यता आहे. यंदा सुमारे ६४ हजार ८०० हेक्‍टरवर भात लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील भोर, मावळ, मुळशी, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे भात उत्पादक तालुके म्हणून ओळखले जातात. भाताचे सरासरी ७२ हजार ९५४ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी चालू वर्षी खरीप हंगामात ६४ हजार ८०० हेक्‍टरवर भात लागवड होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यापासून तयारी सुरू केली आहे.

जून महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्यास सुरवात केली होती. सध्या रोपवाटिकेतील रोपेवाढीच्या अवस्थेत आहे. सध्या पश्‍चिम पट्ट्यात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून भात लागवडीस सुरवात केली आहे. भात लागवडीसाठी मनुष्यबळाची अडचण येत असली तरी अनेक शेतकरी इर्जिक पद्धतीचा अवलंब करू लागले आहेत. त्यामुळे वेळेत भात लागवड होणार असल्याचे मुळशीतील शेतकरी नीलेश शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी सुमारे पाच हजार ८१६ हेक्‍टरवर भात रोपवाटिका केल्या असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. परंतु, अनेक शेतकरी एसआरटी पद्धतीने भात लागवड करीत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा लागवडीसाठी रोपांची अडचणी येणार नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

यंदा कृषी व आत्माअंतर्गत मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्‍यातील बहुतांशी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. प्रशिक्षित झालेले बहुतांशी सर्व शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करणार असल्याने रोपांचीही बचत होणार आहे. पश्‍चिम पट्यात सुमारे १०० हेक्‍टरवर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.  

तालुकानिहाय भात लागवड क्षेत्र (हेक्‍टर)
तालुका नियोजित क्षेत्र रोपवाटिकेचे क्षेत्र
हवेली २५०० २०४
मुळशी ८२७६ ६९०
भोर   ८५५० ७९५
मावळ १२,११० ११५०
वेल्हे ६१३४ ५९३
जुन्नर १२,७६० ११८४
खेड ७३०० ५९४
आंबेगाव ५७५० ५०१
पुरंदर १७२७ १०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com