मराठवाड्यातील ११८३ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

मराठवाड्यातील ११८३ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत
मराठवाड्यातील ११८३ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत
औरंगाबाद  :  यंदा ऑक्‍टोबरअखेरीस जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत मराठवाड्यातील ११८३ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व नांदेडमधील ३३४ गावांसह परभणी जिल्ह्यातील सर्व ८४९ गावांचा समावेश आहे. 
 
शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१५च्या निर्णयानुसार लागवडीखालील एकूण पिकाच्या २/३ किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र हे खरीप असल्यास रब्बी हंगामाची वाट न पाहता पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ही सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आल्याचे महसूल शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
सुधारित पैसेवारी जाहीर करताना मराठवाड्यात एकूण लागवडीखालील क्षेत्र ५६ लाख ६१ हजार ३९४.१३ हेक्‍टर असून त्यापैकी ५१ लाख ६ हजार ९७३.९७ हेक्‍टरवर प्रत्यक्षात पेरणी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ४ लाख २५ हजार ३०१.०४ हेक्‍टर क्षेत्र पडीक असल्याचेही सुधारित पैसेवारीच्या आकड्यांसोबत जाहीर करण्यात आले आहे.  
 
मराठवाड्यातील ८५२५ गावांची हंगामी पैसेवारी सप्टेंबरअखेरीस सादर करण्यात आली होती. त्यामध्ये मराठवाड्यातील ३१२ गावांचीच पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली होती. त्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या हंगामी पैसेवारीत औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ गावांसह परभणी जिल्ह्यातील २१९ गावांचा समावेश होता.
 
सोयाबीन, उडीद, मग, कपाशी, आदी प्रमुख पिकांच्या उत्पादनात पावसाचा प्रदीर्घ खंड व त्यानंतर परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे घट झाली असताना अत्यल्प गावातील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; परंतु सुधारित आणि अंतिम आणेवारीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष सुधारित पैसवारीकडे लागले होते. 

नोव्हेंबरच्या सुरवातीलाच शासनाच्या महसूल शाखेकडून जाहीर केलेल्या पैसेवारीत ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये हंगामी पैसेवारीच्या तुलनेत ८७१ गावांची भर पडली आहे. सुधारित पैसेवारीत औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, सोयगाव व औरंगाबाद या तालुक्‍यांतील २०७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व ८४९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्‍यातील ९२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. जालना तालुक्‍यातील ३५ गावांमध्ये पावसाचा खंड, उगवण होऊनही वाढ न होणे आदी कारणांमुळे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील ७३४२ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ११४६, जालना जिल्ह्यातील ९३६, हिंगोली जिल्ह्यातील ७०७, नांदेड जिल्ह्यातील १४७०, बीड जिल्ह्यातील १४०३, लातूर जिल्ह्यातील ९४३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३७ गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com