साश्रू नयनांनी भाऊसाहेंबाना अखेरचा निरोप

साश्रू नयनांनी भाऊसाहेंबाना अखेरचा निरोप
साश्रू नयनांनी भाऊसाहेंबाना अखेरचा निरोप

खामगाव, जि. बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांना शुक्रवारी (ता. १) हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. खामगाव येथे सिद्धिविनायक टेक्निकल महाविद्यालयाच्या परिसरात हजारोंच्या उपस्थितीत फुंडकर यांचे सुपुत्र सागर आणि आमदार आकाश फुंडकर यांनी मुखाग्नी दिला.  या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रावसाहेब दानवे, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षाताई खडसे, कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एम. भाले, एमएसआरडीसीचे सहसंचालक चंद्रकांत पुलकुंडवार, वसंतराव नाईक विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डाॅ. प्रदीप इंगोले यांच्यासह कृषी खात्याचे असंख्य अधिकारी उपस्थित होते.    कृषिमंत्री श्री. फुंडकर यांचे गुरुवारी (ता. ३१) पहाटे मुंबईतील सायन रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ही वार्ता या भागात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विशेष विमानाने त्यांचे पार्थिव अकोला विमानतळावर आणण्यात आले. यानंतर हे पार्थिव मोटारीने खामगाव येथे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले होते. या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. त्यांच्या खामगावस्थित निवासस्थानी चाहत्यांची भेटीसाठी रीघ लागली होती.  शुक्रवारी सकाळी फुंडकर यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रेला सुरवात झाली. ही अंत्ययात्रा भाजप कार्यालय, गांधी बगीचा, कमानी गेट, एकबोटे चौक, भगतसिंग चौक, फरशी, मेनरोड, टिळक पुतळा, चाँदमारी, शेगाव नाका, शेगाव रोडने मार्गक्रमण करीत सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या प्रांगणामध्ये दाखल झाली. याठिकाणी शोकाकुल वातावरणात शेवटचा निरोप देण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पार्थिवाला आदरांजली वाहली. 

संवेदनशील नेता गेला ः मुख्यमंत्री कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारे भाऊसाहेब यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अत्यंत आक्रमकपणे ते मुद्दा रेटून धरायचे. मात्र मुद्दे रेटून धरताना त्यांनी कधी संबंधांमध्ये कटुता येऊ दिली नाही. ते एक हाडाचे शेतकरी होते. शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे त्यांनी माहिती असायचे. त्यांनी कृषी विद्यापीठातील कृषी संशोधन, विस्तार कार्याला चालना दिली. विद्यापीठांपर्यंत जाणारे ते कृषिमंत्री होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, अशोक सोनोने, खासदार प्रतापराव जाधव, वारकरी संप्रदायाचे संजय महाराज पाचपोर यांनीही आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com