धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पपई दराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा विषाणूजन्य रोगांमुळे उत्पादनावर परिणाम झाला. दरांचा तिढा दोनदा निर्माण झाला. आता शेतकरी चेरी तयार करण्यासाठी लागणारी हिरवी व लहान पपई रावेर, बऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्यांना देत आहेत. - छगन पाटील, शेतकरी, निमझरी, जि. धुळे.
पपई
पपई
धुळे   ः नंदुरबार व धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पपईच्या दुय्यम दर्जाचा मुद्दा मांडून व्यापाऱ्यांनी खरेदीस नकार दिला. यातच हा दरांचा मुद्दा तयार होत असतानाच शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन पपईची सहा रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दरात विक्रीची तयारी दाखविली आहे. 
 
धुळे जिल्ह्यातील तालुक्‍यात काही प्रमाणात पपईची लागवड झाली आहे. शिरपूर भागात अधिक लागवड असून, या भागात दर्जेदार पपईचे उत्पादन शेतकरी घेतात. निमझरी, अर्थे, कुवे, तरडी, भाटपुरा, होळनांथे आदी भाग पपई उत्पादनात आघाडीवर आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा या भागांत पपईची लागवड झाली आहे. नंदुरबार तालुक्‍यातील तापी काठानजीकच्या काही गावांमध्ये पपई लागवड झाली आहे.
 
आता उष्णता वाढल्याने पपईच्या खपाचा मुद्दा समोर आला आहे. त्यातच उष्णतेमुळे चांगली फळे तयार होत नसल्याचा दावा करून कमी दरात पपई द्या, अशी मागणी पपई व्यापाऱ्यांनी केली. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशातील इंदूर आदी ठिकाणचे व्यापारी या भागात पपईची खरेदी करतात. 
 
दरांचा मुद्दा उपस्थित होताच शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमध्ये विशेष सभेचे आयोजन केले. व्यापाऱ्यांना त्यात बोलावून एकमेकांची भूमिका मांडली. पूर्वी पपईची खरेदी सहा रुपये ७५ पैसे प्रतिकिलो या दरात होत होती. या दरात बदल करून पुढे सहा रुपये ३५ पैसे प्रतिकिलो या दरात पपईची खरेदी व विक्री करायचा निर्णय या सभेत झाला.
 
सध्या पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. व्यापारी कमी अधिक दर देण्याचे प्रकार करू लागले आहेत. अशातच शिरपुरातील काही शेतकऱ्यांनी रावेर, बऱ्हाणपूरमधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून दोन रुपये प्रतिकिलो या दरात कच्ची किंवा हिरवी लहान आकाराच्या पपई विक्री सुरू केली आहे, अशी माहिती मिळाली. 
----------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com