परभणी जिल्ह्यातील जमिनीचा सामू विम्लमय

परभणी जिल्ह्यातील जमिनीचा सामू विम्लमय

परभणी ः परभणी जिल्ह्यातील जमिनीचा सामू अल्कली म्हणजेच विम्लमय आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ते सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन वर्षांतून एकदा हिरवळीची खते, कंपोस्ट खते, शेणखत, गांडूळ खते आदींचा वापर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मृदा आरोग्य पत्रिक वितरण अभियान अंतर्गत २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षी परभणी जिल्ह्यातील एकूण २४,३४८ मृदा नमुन्यांची तपासणी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत केल्यानंतर हे निष्कर्ष आढळून आले आहेत. तपासणी करण्यात आलेल्या मृदा नमुन्यामध्ये परभणी तालुक्यातील ५,६६९ मृदा नमुने, जिंतूर तालुक्यातील ३,३७६, सेलू तालुक्यातील ३,३११, मानवत तालुक्यातील १,२९५, पाथरी तालुक्यातील ७१२, सोनपेठ तालुक्यातील २,०९८, गंगाखेड तालुक्यातील ३,४८९, पालम तालुक्यातील १,५७०, पूर्णा तालुक्यातील २,४४८ मृदा नमुन्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, पूर्णा, दुधना आदी नद्यांच्या काठची जमीन खोल काळी माती असलेली भारी जमीन आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यांच्या डोंगराळ भागातील दगडगोट्याची हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. जिल्ह्यातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी ते मध्यम म्हणजेच ०.२५ ते ०.७५ टक्का आहे. मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्राचे (नायट्रोजन) प्रमाण कमी ते मध्यम (१४० ते ५६० किलो प्रति हेक्टर)  स्फुरदाचे (फाॅस्फरस) प्रमाण कमी (५ ते १० किलो प्रति हेक्टर) तर पालाशचे (पोटॅश) प्रमाण अत्यंत भरपूर (५६० किलो प्रति हेक्टरपेक्षा जास्त) आढळून आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सरासरी ४२.११ टक्के मृदा नमुन्यांमध्ये जस्ताची (झिंक), ४८.७७ टक्के मृदा नमुन्यांमध्ये लोहची (फेरस), १.४३ टक्के नमुन्यांमध्ये मंगलची (मॅगेनीज), ०.१४ टक्का मृदा नमुन्यांमध्ये तांब्याची (काॅपर) कमतरता आढळून आली आहे. तसेच सर्व तालुक्यांतील जमिनीचा सामू किंचित ते मध्यम अल्कली म्हणजेच विम्लमय असून, विद्युत वाहकता (इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी) सर्वसाधारण आहे. जमिनीचा सामू विम्लमय असल्याने शेतकऱ्यांनी हिरवळीची खते देण्यासाठी ताग, ढेंचा आदी पिकांची लागवड करून ती जमिनीत गाडणे आवश्यक आहे. कंपोस्ट खते, शेणखत, गांडूळ खतांचा वापर तीन वर्षांतून एकदा करणे अत्यंत आवश्यक आहे. नत्राचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकास रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा २५ टक्के अतिरिक्त नत्र द्यावे लागेल. सुपीकता निर्देशांकानुसार जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा ६७ टक्के वाढवून द्याव्यात. कमी असल्यास शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा ३३ टक्के वाढवून द्याव्यात. मध्यम असल्यास खतांच्या मात्रा शिफारशीप्रमाणे द्याव्यात. भरपूर असल्यास शिफारस केलेल्या खतमात्रेच्या ३४ टक्के खतमात्रा कमी देणे. अत्यंत भरपूर असल्यास शिफारस केलेल्या खतमात्रेच्या ६७ टक्के खत कमी देणे. जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खते, निंबोळी खते, सल्फर (गंधक) आच्छादित युरिया यासारख्या संतुलित खतांचा वापर करणे आवश्यक आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे शक्य आहे असे जिल्हा मृद् सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com