‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी करावी’

‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी करावी’
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी करावी’

मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात कृषिपंपांच्या वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या २ लाख ४९ हजार ३५८ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्‍टिम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. कृषिपंपांच्या वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ६५ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असून, उर्वरित ८३ हजार ९०२ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन कंपनीने केले आहे. महावितरणद्वारे सर्वच प्रकारच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी, वीजजोडणीची सद्यस्थ‍िती, वीजबिल व वीजबिलांचा भरणा, वीज स्थगितीची सूचना, मीटर रीडींग इत्यादी एसएमएस ग्राहकांना पाठविण्यात येतात. महावितरणने कृषिपंपाना उच्चदाब वीज वितरण प्रणालीकद्वारे वीजजोडणी देण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रणालीतील कामांना सुरवात होणार आहे. या प्रणालीतील कामे कोणत्या टप्प्यात आहेत तसेच कृषिपंपाना वीजजोडणी देण्याबाबतची सद्यस्थिती काय आहे, इत्यादी माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली नसेल त्यांनी महावितरण मोबाईल ॲप, शाखा कार्यालय किंवा १८००-१०२-३४३५ अथवा १८००-२३३-३४३५ तसेच १९१२ या टोलफ्री क्रमांकाशी संपर्क साधून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार राज्यातील ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपांना वीजजोडण्या दिलेल्या असून कृषिपंपांसाठी मोठ्याप्रमाणात विजेचा वापर करण्यात येतो. या पद्धतीमुळे एकाच रोहित्रावरून १५ ते २० कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीची लांबी वाढते. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्यामुळे कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा मिळणे, रोहित्र वारंवार बिघडणे, वीजपुरवठा खंडित होणे, वीजहानी वाढणे, वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व अडचणींवर मात करून राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी या प्रणालीद्वारे कृषिपंपाच्या जागेपर्यंत उच्चदाब वाहिनी उभारण्यात येणर असून त्यांच्या वीजभारानुसार विविध क्षमतेचे (१०, १६ किंवा २५ एव्हीए) रोहित्र उभारण्यात येणार आहेत. या रोहित्रावरून एक किंवा दोन शेतकऱ्यांनाच वीजजोडणी दिली जाणार असल्यामुळे या प्रणालीचा (एचव्हीडीएस) शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. तरी पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी तातडीने करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com