नगर : चार छावण्यांची परवानगी रद्द

चार छावण्यांची परवानगी रद्द
चार छावण्यांची परवानगी रद्द

नगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी देऊनही मुदतीत छावणी सुरू न केल्याने चार संस्थांची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी परवानगी रद्द केली. यात नगर-दोन, शेवगाव, पारनेर येथील प्रत्येकी एक अशा चार संस्थांचा समावेश आहे. पशुधनाच्या सेवेत कुचराई करणाऱ्या दोन संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात पारनेर, कर्जत येथील प्रत्येकी एका छावणीचा समावेश आहे.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधनाची हेळसांड होऊ नये, म्हणून सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात आजअखेर ३२९ छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २०५ चारा छावण्या प्रत्यक्ष सुरू आहेत. छावणीला मंजुरी दिल्यानंतर आठ दिवसांच्या आत चारा छावणी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंजुरी आदेशातच नमूद करण्यात आले आहेत. मात्र मुदत उलटून गेल्यानंतरही काही संस्थांनी चारा छावणी सुरू करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे परिसरातील पशुधनाची होणारी हेळसांड लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी तब्बल ३६ संस्थांची चारा छावणी परवानगी रद्द केली होती.

त्यानंतर पुन्हा दिरंगाईचा प्रकार आढळल्याने काही संस्थांना संधी म्हणून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्या नोटिसांचाही खुलासा सादर न केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती (पोखर्डी), नगर तालुका खरेदी-विक्री संघ (जेऊर) व शेवगाव तालुक्‍यातील विक्रमराजे सामाजिक प्रतिष्ठान (नांदूर विहिरे) या संस्थांची परवानगी रद्द करण्यात आली, तर पारनेर तालुक्‍यातील सावरगावकरिता पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्याकडे पशुधनच उपलब्ध होत नसल्याने छावणीची परवानगी रद्द केली.

छावणीत दाखल झालेल्या पशुधनाला आवश्‍यक सुविधा संस्थेद्वारे मिळतात का नाही, यावर प्रशासनप्रमुख जिल्हाधिकारी द्विवेदींचे जातीनिशी लक्ष आहे. या अनुषंगाने छावण्यांच्या तपासणीसाठी तब्बल ३२ पथके तैनात करण्यात आली आहेत. सुविधेत कुचराई आढळल्याने दोन संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथील संकल्प युवा प्रतिष्ठान आणि कर्जत तालुक्‍यातील घुमरी येथील श्रीराम अंध, अपंग औद्योगिक संस्थेचा समावेश आहे. या संस्थांना अनुक्रमे १२ हजार ९८० व ५७ हजार ५७० रुपये दंड ठोठावण्यात आला.

छावण्यात दाखल जनावरे 

पाथर्डी २४,४७७
कर्जत १६,१८९
जामखेड  १९,३५१
नगर   १४,९४१
पारनेर  ११,२६६
शेवगाव  १४,४५७
श्रीगोंदे १०,४६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com