सोयाबीनची खरेदी खासगी बाजारांतही सुरू करा : मुख्यमंत्री

सोयाबीनची खरेदी खासगी बाजारांतही सुरू करा : मुख्यमंत्री
सोयाबीनची खरेदी खासगी बाजारांतही सुरू करा : मुख्यमंत्री

मुंबई : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खासगी परवानाधारक बाजार समिती परिसरातही खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, गटशेती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आदी विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की जलयुक्तमधील कामांची छायाचित्रे जोपर्यंत अपलोड होणार नाहीत, तोपर्यंत ती कामे पूर्ण झाल्याचे समजले जाणार नाही. मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. सिमेंट नालाबांधसाठी मेरी संस्थेने तयार केलेला आराखडा वापरण्यासंदर्भात विचार करावा. तसेच जलयुक्त शिवार, नरेगा अंतर्गतची कामे कमी खर्चात व लोकसहभागातून करण्यासाठी नवनवीन प्रयोग करावेत. गटशेती योजनेसाठी राज्यातून ६८६ प्रस्ताव आले आहेत. या सर्व प्रस्तावांची छाननी करून त्यांना तातडीने मान्यता देण्यात यावी, तसेच योजनेत जास्तीत जास्त सहभाग वाढविसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांनाही या योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात विचार करावा. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात कृषी साधनांची टूल व मशिनरी बँक तयार झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी शेतमालाच्या खरेदी प्रक्रियेचाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या परिसराबरोबरच खासगी परवानाधारक कृषी उत्पन्न बाजाराच्या परिसरातही खरेदी केंद्रे उभारण्याची व्यवस्था मार्केटिंग फेडरेशने करावी. तसेच खरेदी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कृषी व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. कापसावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वेळी मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी,   कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com