पूर्व विदर्भात धानावर गादमाशी, खोडकिडीचा प्रादुर्भाव

कृषी विभागाकडून नुकतेच नियंत्रणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. परंतु उत्पादकतेवर परिणाम तर होणारच आहे. बहुतांश भागांत खोडकिडी दिसून आली. - ज्ञानेश्‍वर बावनकुळे, मकरधोकडा, ता. जि. भंडारा.
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी, खोडकिडीचा प्रादुर्भाव
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी, खोडकिडीचा प्रादुर्भाव

नागपूर ः पूर्व विदर्भात यंदा पावसाअभावी ८० टक्‍के क्षेत्रावरच धान पिकाची लागवड झाली आहे. येथील पाच जिल्ह्यांत सुमारे सात लाख हेक्‍टरवर धान (भात) पीक घेतले जाते. या वर्षी भातशेतीला पूरक पाऊस झाला नाही. उशिरा रोवणी आणि हवामान बदलाने धान पिकाला कीड-रोगाने पोखरले असून, पिकाला वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे.

भंडारा व नागपूर जिल्ह्यांत सुमारे दोन लाख एकर क्षेत्र यामुळे पडीक राहिल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भंडारा जिल्ह्यात या वर्षी सरासरीच्या केवळ ६८ टक्‍केच; तर नागपूर जिल्ह्यात ९८ टक्‍के रोवणी होऊ शकली. गोंदिया जिल्ह्यात ७४, चंद्रपूर ८३ आणि गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक १९०६ टक्‍के क्षेत्रावर रोवणी झाल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.

धान रोपवाटिका टाकल्यानंतर २१ दिवसांत त्याची पुनर्लागवड करावी लागते. परंतु धान पऱ्हे ७० ते ८० दिवसांचे होऊनही पाऊस आला नाही. परिणामी रोवणी रखडली. पऱ्हे टाकल्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना रोवणीच (पुनर्लागवड) करता आली नाही.

उशिरा रोवणी केलेल्या धानावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पानावर कडा करप्याचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. यामध्ये पानांच्या कडा करपतात. प्रतिकूल हवामान हे त्यामागील कारण आहे. पानावर, खोडावर व लोंबीवर तपकीरी ठिपके पडतात. जिवाणूजन्य रोगाची लक्षणेदेखील काही भागांत दिसून आली आहेत. झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया यामुळे थांबते, असे भंडारा केव्हीकेच्या तज्ज्ञ डॉ. उषा डोंगरवार सांगतात.

लाखनी तालुक्‍यात गादमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. फुटव्यावरच गादमाशी हल्ला करते. जुन्या म्हणजे रोवणीला दोन, अडीच महिने झाले अशा धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव पऱ्हे असतानाच्या काळातच दिसला होता. या सर्व कारणांमुळे पूर्व विदर्भात धान उत्पादकतेत घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  

धान लागवडीचे सरासरी क्षेत्र हेक्‍टरमध्ये (कंसात प्रत्यक्ष रोवणी)
नागपूर ७३६.०० (७२१.३८)
भंडारा १८२८.०० (१२४६.४३)
गोंदिया १७८२.०० (१३१५.५१)
चंद्रपूर १४६५.०० (१२१२.५५)
गडचिरोली १५३२.०० (१६३३.५५)
एकूण ७३४३.०० (६१२९.२१)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com