भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी अळी

सध्या उन पावसाचा खेळ सुरू आहे. पाऊस थांबल्यास जादा कालावधीच्या भात जातीवर करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. - प्रा. चंद्रकांत सरवटे, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, राधानगरी, जि. कोल्हापूर
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी अळी
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी अळी

कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला तरी त्यात सातत्य नसल्याने राज्यातील भात पट्ट्यात अनेक ठिकाणी तांबेरा, करप्यासह पाने गुंडाळणाऱ्या अळीने शिरकाव केला आहे. राज्यात प्रत्येक वेगवेळ्या भागात रोग, कीड पसरत आहे. विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत याची तीव्रता जाणवत आहे, यामुळे भात उत्पादक हवालदिल झाला आहे.

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये दमट हवामानामुळे करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाचा अनियमितपणा व वाढलेली उष्णता यामुळे विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात भातावर करपा दिसत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील भातावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव आढळत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सुमारे ३ लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली आहे. करप्यामुळे भाताची पाने वाळून जाऊ लागली आहे. काही ठिकाणी जास्त प्रमाणात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात का होइना परंतु, भातक्षेत्रावर रोग किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या भाताचे तांबेऱ्यामुळे नुकसान होत आहे. या भागात यंदा शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला असला तरी कधी पाऊस तर कधी कडक ऊन असे हवामान असल्याने ते रोगाला निमंत्रण देत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. पुणे, लोणावळा भागात भातावरील रोग किडीचे प्रमाण अधिक आहे. नाशिक मध्येही करप्याची लागण झाली आहे. पावसाची अनियमितता अशीच राहिल्यास उशिरा पक्व होणाऱ्या भाताला त्याचा फटका बसू शकतो, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

कोकणात परिस्थिती नियंत्रणात? कोकणात सुमारे चार लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड आहे. गेल्या महिन्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाल्याने कोकणातील भातावर रोग कीड अत्यल्प प्रमाणात असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. गेल्या पंधरवड्यापासून पावसाचे प्रमाण वाढल्याने रोग कीडही अपवाद वगळता नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. सावंतवाडी विभागात काही प्रमाणात निळे भुंगेरे आढळून आले आहेत. पण त्याची तीव्रता कमी असल्याचे सांगण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी भागात सध्या तरी लवकर लागवड झालेल्या क्षेत्रात करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. याचबरोबर पाने गुंडाळणारी अळीही अनेक ठिकाणी सापडत आहे. पण एकूण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण फारसे नाही. पण हवामान बदलल्यास यात वाढ होऊ शकते, असे विजय पाटील (सहाय्यक संचालक, इगतपुरी संशोधन केंद्र, नाशिक) यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात निळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आढळला आहे. पण तो सध्या तरी फारसा नुकसानकारक नाही. सध्या पावसाचा जोर असल्याने भाताची काढणी होइपर्यत रोग कीड येण्याची शक्‍यता कमी आहे, असे अजित आडसुळे ( उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी, जि., सिंधुदुर्ग) यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com