बोंड अळी नियंत्रणासाठी अनुदानावर कीटकनाशके

बोंड अळी नियंत्रणासाठी अनुदानावर कीटकनाशके
बोंड अळी नियंत्रणासाठी अनुदानावर कीटकनाशके

नांदेड ः पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप)अंतर्गंत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण १४ हजार १२५ हेक्टर कपाशीवरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात यंदा ३ लाख २३ हजार हेक्टवर कपाशीची लागवड झाली आहे. सद्यस्थितीत पाते, फुले लागलेल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ७ हजार ८७५ हेक्टर कपाशीवरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस, प्रोफेनोफाॅस आणि क्विनाॅलफाॅस या कीटकनाशकांचा ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणार आहे.

कीटनाशकांच्या पुरवठ्यासाठी तालुकानिहाय कपाशीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) असे ः नांदेड २३२, अर्धापूर, १३९, मुदखेड ८७, कंधार ४३०, लोहा ६२३, देगलूर ३४९, मुखेड ३९७, बिलोली ३२२, धर्माबाद ३२४, नायगाव ३२२, किनवट १२०५, माहूर १०५४, हदगाव ८०८, हिमायतनगर ४८४, भोकर ८५३, उमरी २४६ याप्रमाणे आहे. परभणी जिल्ह्यात १ लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जून महिन्यात लागवड केलेल्या कपाशीवर मोठ्या प्रमाणावर बोंड अळी आढळून आली आहे. जिल्ह्यातील ६ हजार २५० हेक्टर कपाशीवरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर किटकनाशके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी तालुकानिहाय कपाशीचे क्षेत्र (हेक्टर) परभणी १ हजार १५०, जिंतूर १,१४५, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा प्रत्येकी ५६५ हेक्टरवरील कपाशीचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यात १३१ हेक्टरवरील सोयाबीन, ६७ हेक्टरवरील तूर या पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठीदेखील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परंतु सद्यःस्थितीत परभणी जिल्ह्यातील बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आहे. त्यामुळे सध्या उद्दिष्टानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदानावरील कीटकनाशकांचा पुरवठा करता येणार नाही. त्यामुळे कपाशीच्या क्षेत्राचे उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com