औरंगाबाद, जालना जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने अवकळा

गुलाबी बोंडअळी
गुलाबी बोंडअळी

औरंगाबाद  : गुलाबी बोंडअळीने यंदा राज्यातील सर्वच भागांत कापूस पिकावर आक्रमण केले आहे. औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील ६ लाख ८६ हजार ८३४ हेक्‍टरवरील कपाशीच्या क्षेत्रात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे या दोन्ही जिल्ह्यांतील ९५ हजारांवर शेतकऱ्यांनी ‘जी’ फॉर्मच्या माध्यमातून कृषी विभागाकडे बोंड अळीविषयी तक्रार केली आहे. तसेच ३० नोव्हेंबरपर्यंत दोन्ही जिल्ह्यांतील ९८९ हेक्‍टरवरील पिकाची जिल्हा/तालुका तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष पाहणी केली आहे.  यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील ६५ महसूल मंडळात यंदा ४ लाख ७ हजार २९४ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. औरंगाबाद जिल्ह्यात कापाशी लागवड झालेल्या सर्वच महसूल मंडळात गुलाबी बोंड अळीने यंदा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे.  बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने ‘जी’ फार्मच्या माध्यमातून नुकासान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाकडे तक्रार अर्जांचा अक्षरश: पाऊस पाडत आहे. ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ८१८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ‘जी’ फॉर्मच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या. तक्रारीचा ओघ सुरूच आहे. दाखल तक्रारींपैकी ८८२ हेक्‍टरवरील क्षेत्राची जिल्हा वा तालुका तक्रार निवारण समितीने पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘एच’ फॉर्ममधील प्राथमिक तपासणी त्यानंतर ‘आय’ फॉर्ममधील जिल्हास्तरीय समितीच्या पाहणीनंतर प्राप्त तक्रारींचा अहवाल नियंत्रकांकडे पाठविला जातो. त्यानंतर नुकसानभरपाईची निश्चिती करण्याचे सूत्र या प्रक्रियेच्या माध्यमातून अवलंबिले जात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  जालना जिल्ह्यात शेतकरी हवालदिल जालना जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांतील ४९ महसूल मंडळात यंदा २ लाख ७९ हजार ५४० हेक्‍टरवर कपाशीची पेरणी झाली. या संपूर्ण क्षेत्रातही यंदा बोंड अळीच्या नुकसानीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे. आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेल्या क्षेत्रामध्ये मंठा तालुक्‍यातील १७ हजार ८४२ हेक्‍टर, परतूरमधील ३९०५१ हेक्‍टर, जाफराबाद तालुक्‍यातील २२४५१ हेक्‍टर, भोकरदन तालुक्‍यातील ४४०५९ हेक्‍टर, घनसावंगी तालुक्‍यातील ३४७७६ हेक्‍टर, अंबड तालुक्‍यातील ५००९७ हेक्‍टर, बदनापूर तालुक्‍यातील ३०७९४ हेक्‍टर, तर जालना तालुक्‍यातील ४०४७० हेक्‍टरवरील बाधित क्षेत्राचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील २३ हजार ६०७ शेतकऱ्यांनी ‘जी’ फॉर्मच्या माध्यमातून यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या असून, त्यापैकी १०७ हेक्‍टरवरील पिकाची जिल्हा वा तालुका तक्रार निवारण समितीने ३० नोव्हेंबरपर्यंत पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशी ठरते आर्थिक नुकसानीची पातळी साधारणपणे पाच ते दहा टक्‍के पाते, फूल, बोंड प्रादुर्भावग्रस्त आढळली किंवा कामगंध सापळ्यांमध्ये सतत तीन दिवस ८ ते १० पतंग आढळल्यास कपाशी पिकात आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याचे मानले जाते. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कपाशीच्या पिकात तर बोंड अळीचा उद्रेक झाला आहे.  ६० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने कपाशी उत्पादक हतबल झाला आहे. तक्रारीमुळे पंचनाम्याचे काम सुरू असून, प्रत्येक मंडळ, तालुका व जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्या त्या भागातील कपाशीच्या नुकसानीचे प्रमाण स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com