अकोल्यात बोंडअळी प्रादुर्भावाबाबत तक्रारींचा अाेघ वाढला

अकोल्यात शेंदरी बोंडअळीचा कपाशीवर प्रादुर्भाव
अकोल्यात शेंदरी बोंडअळीचा कपाशीवर प्रादुर्भाव
अकाेला : जिल्ह्यात या हंगामात लागवड झालेल्या बीटी कपाशीला बोंडअळीने नेस्तनाबूत केले असून अातापर्यंत एक हजारांवर शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या अाहेत. या तक्रारींवर थेट पंचनामे केले जात असून, तक्रारींचा अोघ वाढता अाहे. जिल्ह्यात कृषी विभागाकडे अातापर्यंत दाखल ११०० तक्रारींमध्ये तेल्हारा तालुक्यातून सर्वाधिक साडेसहाशेपेक्षा अधिक तक्रारी अाहेत. या तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव सर्वाधिक झालेला अाहे.
 
बीटी कपाशीची लागवड करूनही लागवडीनंतर अवघ्या ५० दिवसांतच या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसायला लागला होता. प्रामुख्याने प्री-मॉन्सून लागवड केलेली कपाशी या अळीच्या भक्ष्यस्थानी पडली अाहे. कपाशीची व्यवस्थित वाढ, झाडांवर चांगल्या बोंड्या लागूनही गुलाबी बोंडअळी हे पीक पोखरून काढले अाहे. अनेक शेतकऱ्यांनी काहीच उत्पादन येत नसल्याने पिकात ट्रॅक्टर फिरवला. उत्पादन जास्त येते म्हणून शेतकऱ्यांनी कपाशीच्या बीटी बियाण्याची लागवड केली खरी, परंतु या हंगामात शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघू शकलेला नाही. तक्रारींचा अोघ सातत्याने वाढत असून, पिकाचे पंचनामे करताना कृषी अधिकारी व तज्ज्ञांच्या नाकीनऊ येत अाहेत. 
 
दाखल झालेल्या तक्रारींच्या अहवाल तपासणीवरून व निवडक गावांत प्रत्‍यक्ष पाहणी करून कृषी विभागाचे अधिकारी सर्वेक्षण, पंचनामे करीत अाहेत. यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठित करण्यात आली अाहे. अातापर्यंत तेल्हारा तालुक्यातून सर्वाधिक ६०४ तक्रारी अालेल्या असून, १६० ठिकाणी तपासणी करण्यात अाली. याशिवाय मुर्तिजापूरमध्ये ३१० तक्रारी अाहेत. अकोट तालुक्यात १२५, बार्शीटाकळी २२, अकोला २५,  बाळापूर ९, पातूर २ अशा एक हजार ९७ तक्रारी अालेल्या अाहेत. 
 
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेकऱ्यांवर सध्या बोंडअळीमुळे मोठे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जांवर कार्यवाही करून त्यांना मदत न दिल्यास व दोषी बियाणे कंपन्यांवर फाैजदारी कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीतर्फे अघोषित आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अाहे.  
 
बोंडअळीमुळे मोठे नुकसान झालेल्या बीटी कपाशीची पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यंत्रणांनी शेतात जाऊन सर्वेक्षण करावे व वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवावा, असे निर्देश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी शेलुबोंडे, जांभा खूर्द ,मंगरूळ कांबे, शेलू वेताळ,भटोरी या गावांना भेट दिली. या वेळी आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय कृषी अधिकारी कुलकर्णी, तहसीलदार राहुल तायडे, कृषी अधिकारी निघोट, धनंजय ढोक, दिग्विजय गाडेकर, राजकुमार नाचणे, मोरेश्वर बोंडे, विजय मोरे, हरिभाऊ आसटकर, भास्कर मोरे, नंदकिशोर दशरथी, विजय तायडे, अनिल जावरे, महादेव खांडेकर उपस्थित होते.
 
वाशीम जिल्ह्यातील कापूस पिकावरदेखील शेंदरी बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, कापूस पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत व बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
 
वाशीम जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात जवळपास ३१ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली अाहे. परंतु, या पिकावर शेंदरी बोंडअळीचा  प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात घट सहन करावी लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com