शेतकऱ्यांच्या मोर्चावर पोलिसांची दडपशाही

आंतरराष्ट्रीय अहिंसादिनी दिल्लीत येऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली. आता शेतकरी राजधानीमध्ये येऊन आपल्या व्यथासुद्धा मांडू शकत नाहीत. - राहुल गांधी, अध्यक्ष, कॉंग्रेस
नवी दिल्ली : किसान क्रांती पदयात्रेदरम्यान सुरक्षा रक्षकांशी झगडताना आंदोलनकर्ता वयस्कर शेतकरी. (पीटीआय)
नवी दिल्ली : किसान क्रांती पदयात्रेदरम्यान सुरक्षा रक्षकांशी झगडताना आंदोलनकर्ता वयस्कर शेतकरी. (पीटीआय)

नवी दिल्ली ः शेतीमालाला हमीभाव द्यावा, शेतीसाठी विजेचा दर कमी करावा, थकीत एफआरपी त्वरित द्यावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, इंधनाचे दर कमी करावेत आदी मागण्यांसाठी भारतीय किसान युनियनने २३ सप्टेंबरला हरिद्वार येथून सुरू झालेल्या किसान क्रांती यात्रेवर मंगळवारी (ता.२) पोलिसांनी बळाचा वापर करत राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखले. या वेळी पोलिसांना बळाचा वापर करत, लाठीमार, अश्रूधुरांच्या नककांड्या फोडल्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला.  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर भारतीय किसान युनियनने हरिद्वार येथून २३ सप्टेंबरला किसान क्रांती यात्रा सुरू केली होती. ही यात्रा उत्तर प्रदेशच्या अनेक भागतून प्रवास करत मंगळवारी (ता.२) दिल्लीत धडकणार होती. या यात्रेत ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मंगळवारी पूर्व उत्तर प्रदेशातील गोंडा, बस्ती आणि गोरखपूर; तसेच ऊस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राजधानी दिल्लीकडे मोर्चा काढला. परंतु, प्रशासनाने या भागात आधीच जमावबंदी लागू केली. दिल्लीच्या सीमेवरच त्यांना रोखण्यात आले आहे. दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅलामिलीटरी फोर्ससुद्धा तैनात करण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापरदेखील शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी करण्यात आला.  शेतकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी बोलाविले, या वेळी शेतकऱ्यांच्या सात मागण्या करण्यात आल्या; पण त्यामुळे त्यांचे समाधान झाले नाही. हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी केला असून, हे शेतकरी आज रात्रभर दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसणार आहेत. या आंदोलनामुळे गाझीपूरच्या सीमावर्ती भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि कृषिराज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत देखील सहभागी झाले होते. या चर्चेपूर्वी राजनाथ यांनी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत चर्चा केली होती. राजनाथ यांच्याशी चर्चा करताना "बीकेयू'चे प्रवक्ते युद्धवीर सिंह यांनी अकरा मुद्दे मांडले, यातील सात मागण्या सरकारने मान्य केल्या असून, अन्य 4 बाबत मात्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये मतैक्‍य होऊ शकले नाही.  प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये प्रवेश द्यायला हवा, त्यांना दिल्लीत येण्यापासून का रोखले जात आहे? ही चुकीची गोष्ट आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.  - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com