अकोल्यात निवडणूक ग्रामपंचायतीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

अकोला ः आगामी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होऊ घातली आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये ८३८ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी रंगणार आहे. यासाठी आचारसंहिता सुरू झाली असून, ऐन हंगामात हा राजकीय फडही रंगला आहे.

यासाठी ७ अाॅक्टोबरला मतदान होत अाहे. पहिल्यांदाच सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता वाढली अाहे. अाजवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपासून दूर राहणारे राजकीय पक्ष या वेळी थेट सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात अाहे.

पूर्वी ग्रामपंचायतींची निवडणूक ही गावातील पॅनेल, अाघाड्यांच्या माध्यमातून लढविली जायची. विभिन्न विचारशैली असलेल्या पक्षांचे नेते एकत्र येऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवीत होते. एका-एका मतासाठी कुरघोडी व्हायची. त्यातही गावपातळीवर सरपंच पदाला तर मोठी प्रतिष्ठा असल्याने या निवडीपूर्वी सदस्यांच्या सहली, वेळप्रसंगी गुप्त जागी सदस्यांना ठेवण्याचे प्रकार सर्रास झाले. अाता थेट सरपंच निवडीमुळे याला पायबंद बसणार अाहे.

येत्या सात अाॅक्टोबरला बुलडाणा जिल्ह्यात २७९, वाशीम जिल्ह्यात २८७ अाणि अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार अाहे. या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला अाहे. ही निवडणुक तशी गाव पातळीवरची असली, तरी वाशीम जिल्ह्यात तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम समजली जात अाहे.

शिवाय २०१७ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गाव पातळीवर अापला सरपंच असावा अशी भूमिका राजकीय पक्ष घेण्याची शक्यता अाहे. सरपंच पद असेल तर गावांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होतो याची जाणीव सर्वच पक्षांना अाहे. निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढण्याची चिन्हे नगर परिषदांच्या धर्तीवर ग्रामपंचायत सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय सर्वांचीच उत्सुकता वाढविणारा अाहे. गावात ज्या पक्षाची बांधणी चांगली असेल त्याचा उमेदवार विजयी होण्याची चिन्हे अधिक असतात. शिवाय स्थानिक पातळीवरील गट-तट, राजकारण, संबंधित उमेदवाराची प्रतिमासुद्धा या थेट निवडीसाठी मदतगार ठरणार अाहे. एकूणच ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा थेट हस्तक्षेप वाढण्याची चिन्हे तयार झाली अाहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com