डाळिंब संघाच्या संशोधनासाठी पुण्यात ५० एकर जागा देऊ

पुणे : अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित वार्षिक अधिवेशनाचे उद्‌घाटन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
पुणे : अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित वार्षिक अधिवेशनाचे उद्‌घाटन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.

पुणे : "शेतीतल्या संशोधनावर फार कमी वेळ आणि पैसा खर्च होतो, संशोधनाच्या कामासाठी वर्षाकाठी काही ठराविक रक्कम राखीव ठेवण्याची गरज आहे. डाळिंब संघाच्या संशोधनाचे काम आणखी विस्तारण्यासाठी पुण्यात ५० एकर जागा आणि २५ लाखाचा निधी देऊ,''असे आश्‍वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी (ता.६) येथे दिली. तसेच मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांसह डाळिंबासंबंधीच्या विविध प्रश्‍नांवर लवकरच बैठक घेणार असल्याचेही मंत्री बापट म्हणाले.   अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या वतीने आयोजित वार्षिक अधिवेशनाचे उदघाटन मंत्री श्री. बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, जैन इरिगेशन सिस्टिमचे अभय जैन, अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे, सोपान कांचन, संघाचे सचिव शिवलिंग संख, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के. बी. पाटील, संघाचे उपाध्यक्ष अरुण देवरे, खजिनदार हरिभाऊ थोरात, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर, जिल्हा विजयकुमार बरबडे, संचालक अंकुश पडवळे आदी उपस्थित होते.   मंत्री श्री. बापट म्हणाले, "डाळिंबाचे उत्पादन हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने त्याचे महत्त्व वेगळे आहे. आरोग्याच्यादृष्टीने अन्य फळांच्या तुलनेतही त्याची वेगळी ओळख आहे. यात प्रक्रिया आणि निर्यातीला यामध्ये मोठा वाव आहे. पण ज्या वेगाने हे काम व्हायला हवे, ते होत नाही, पण डाळिंब संघ या कामासाठी पुढाकार घेते आहे, ते उल्लेखनीय आहे. सरकार शिवायही एक वेगळी यंत्रणा यासाठी काम करते, हे कौतुकास्पद आहे.  आज अनेक संशोधन संस्था, कृषी महाविद्यालय शेतीच्या विविध विषयांवर वेगवेगळ्या भागात काम करत आहेत. पण हे काम आणखी विस्तारण्याची गरज आहे. संशोधनावर वेळ आणि पैसा खर्च होण्याची गरज आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल हे देशही आज औद्योगिकरणापेक्षा शेतीला अधिक महत्त्व देत आहेत, म्हणून ते छोटे देश असूनही आपल्या पुढे आहेत. आपली व्यवस्था तर शेतीवरच आहे. सरकारचा एक घटक म्हणून मी स्वतः माझ्या परीने संघाला मदत करेन. तुम्हीही पुढाकार घ्या, पाठपुरावा करा, डाळिंबाचे चित्र नक्कीच बदलेल.''''

जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के. बी. पाटील यांनी डाळिंबातील परंपरागत पद्धती बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. डाळिंबासाठी टिश्‍यु कल्चर रोपांचा वापर वाढवावा, सरकारनेही या कामासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगितले. पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी डाळिंबाच्या निर्यातवाढीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच डाळिंबासाठी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेची संधी मिळण्याची वाट पाहत आहोत, असे सांगितले. प्रभाकर चांदणे यांनी प्रक्रिया आणि निर्यातीवर लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच संशोधन केंद्राने नवीन वाण विकसित केले. पण ते निर्यातीसाठी फायदेशीर नाही, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी डाळिंबातील विविध समस्या मांडल्या. त्यावर वेगाने काम होण्याची गरज आहे. पण उत्पादन वाढत असल्याने दर घसरत आहेत, आज गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्येही स्पर्धेत आली आहेत. त्यावर हमीभावाचा विचार होण्याची गरज असल्याचे सांगितले.  

डाळिंबरत्न पुरस्काराने गौरव डाळिंब उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील निवडक शेतकऱ्यांचा संघाच्या वतीने डाळिंबरत्न पुरस्काराने मंत्री बापट यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यात योगेश जाधव, ज्ञानदेव सुबुगडे (जालना), भारत पठाडे, शिवाजी घावटे (औरंगाबाद), महादेव शेंडे, बरमु धुमाळ (पुणे), खंडेराव मदने (सातारा), दत्तात्रय नागणे, राहूल जठार, अमरजित जगताप, भगवान चौगुले (सोलापूर), मुरलीधर पाटील, अरुण गवळी (सांगली), रवींद्र पवार, नरेंद्र सोनवणे (नाशिक), रखमाजी पाडेकर (नगर), थारीगोपूला नायडू (आंध्र प्रदेश), शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. मिलिंद जोशी (पुणे) अधिकारी गोविंद हांडे (पुणे) व्यापारी प्रतिनिधी के. डी. चौधरी (पुणे) यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. जैन इरिगेशनतर्फेही उत्कृष्ट डाळिंब उत्पादक म्हणून संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, अतुल बागल आणि पटेल यांचा सन्मान करण्यात आला, तर भंवरलालजी जैन जीवनगौरव पुरस्कार अभय जैन यांना प्रदान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com