राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल १००० ते ५५०० रुपये

डाळींब आढावा
डाळींब आढावा

राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील महिनाभरापासून डाळिंब दरात काहीअंशी वाढले आहेत. सध्या बाजार समित्यांमध्ये डाळिंबाला घाऊक दर १००० ते ५५०० रुपये यादरम्यान मिळत आहेत. आणखी महिनाभर तरी हे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.   पुण्यात १६०० ते ३२०० रुपये  गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१) डाळिंबाची सुमारे १०० टन डाळिंबाची आवक झाली. या वेळी भगवा जातीला प्रति क्विंटल १६०० ते ३२०० रुपये दर मिळाल्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. सध्या उन्हाळी बहराच्या डाळिंबाची आवक सुरू झाली असून, एकूण आवकेचा ३० टक्के आवक ही नवीन हंगामाची आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने हवामानातील उष्णता वाढण्यास सुरवात झाली आहे. परिणामी, आवक कमी हाेऊन दर वाढण्याचा अंदाज काची यांनी व्यक्त केला असून, दर प्रति किलाेला १५० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

अकोल्यात ३५०० ते ५५०० रुपये येथील बाजारात डाळिंबाच्या दरात तेजी अाली अाहे. सध्या गणेश डाळिंब ३००० ते ३५०० रुपये अाणि भगवा जातीचा डाळिंब ५००० ते ५५०० रुपये क्विंटल विकत अाहे. येथे सोलापूर जिल्ह्यातून डाळिंबाची अावक होत अाहे. सध्या अावक फारशी नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. अकोला येथील बाजारात प्रामुख्याने सोलापूर, नाशिक, नगर अादी जिल्ह्यांमधून डाळिंबाची अावक होत असते. सध्या फक्त सोलापूर जिल्ह्यातून डाळिंब येत अाहे. त्याचे प्रमाण सुद्धा कमी अाहे. एक दिवसाअाड २० ते ३० क्विंटलपर्यंत अावक अाहे. अावक कमी असल्याने दर चांगले मिळू लागले अाहे. किरकोळ बाजारात गणेश जातीचा डाळिंब ४५ ते ५० रुपये किलो अाणि भगवा डाळिंब ६० ते ८० रुपये किलो प्रमाणे ग्राहकांना विकली जात अाहे. 

कोल्हापुरात १५०० ते ६००० रुपये येथील शेती उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची दररोज १०० ते १५० कॅरेट आवक होत आहे. डाळिंबास प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये दर मिळत आहे. डाळिंबाची आवक स्थिर असली तरी दरातही विशेष वाढ झाली नसल्याचे फळबाजारातून सांगण्यात आले. कोल्हापूर बाजार समितीत सोलापूर, सांगली, आटपाडी भागांतून डाळिंब विक्रीस येतात. सध्या डाळिंबास फारशी मागणी नसल्याने दरही तेजीत नसल्याचे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सांगितले. दररोज शंभर ते दीडशे कॅरेटची नियमित आवक होत आहे. ३१ जानेवारीला १३० कॅरेटची आवक, तर दर प्रतिकिलो १५ ते ६० रुपये, २४ जानेवारीला १५० कॅरेटची, तर दर २० ते ५० रुपये आणि १७ जानेवारीला २२० कॅरेटची आवक आणि दर १५ ते ५० रुपये मिळाला. 

सांगलीत २००० ते ५००० रुपये येथील विष्णूअण्णा पाटील फळे मार्केटमध्ये डाळिंबाची आवक कमी अधिक प्रमाणात होते आहे. गेल्या महिन्याभरापासून डाळिंबाचे दर स्थिर आहेत. बुधवारी (ता. ३१) डाळिंबाची ४ हजार ७१० डझन आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये, तर सरासरी ४०० रुपये असे दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. विष्णूअण्णा पाटील फळमार्केटमध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्‍यातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होते. आटपाडी व जत तालुक्‍यांतील बाजार समितीत डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होते. आटपाडी व जत तालुक्‍यांतील बाजार समितीमध्ये डाळिंबाला प्रति दहा किलोस २०० ते ५०० रुपये असेच दर मिळत आहेत. डाळिंबाची आवक गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कमी अधिक होऊ लागली आहे. ३ जानेवारीला दहा किलोस २०० ते ४०० व सरासरी ३०० रुपये, १० जानेवारीला २०० ते ४०० व सरासरी ३०० रुपये, १७ जानेवारीला २०० ते ६०० व सरासरी ४०० रुपये, २३ जानेवारीला २०० ते ५०० व सरासरी ४०० रुपये आणि ३१ जानेवारीला २०० ते ५०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाला.  

परभणीत १००० ते ३५०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे -भाजीपाला  मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१) डाळिंबाची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये पंढरपूर परिसरातून आठवड्यातील तीन दिवस डाळिंबाची आवक येत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३२ ते ४० क्विंटल डाळिंबाची आवक होऊन सरासरी प्रतिक्विंटल १२०० ते ३५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१) डाळिंबाची ४० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपये  होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ८० रुपये दराने होती, असे व्यापारी   अब्दुल खदिर यांनी सांगितले. ११ जानेवारीला ३२ क्विंटल आवक होऊन १२०० ते ३३०० रुपये, १८ जानेवारीला ३० क्विंटल आवक, तर दर १५०० ते ३५०० रुपये आणि १ फेब्रुवारीला ४० क्विंटल आवक, तर दर १००० ते ३५०० रुपये मिळाला.

सोलापुरात डाळिंब प्रतिकिलो ७५ रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक वाढली, पण मागणी चांगली असल्याने डाळिंबाचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. डाळिंबाला प्रतिक्विंटल ८०० ते ७५०० व सरासरी २१०० रुपये दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक वाढली. गेल्या दोन आठवड्यांपासून आवकेत सातत्याने वाढ होत आहे. पण मागणी असल्याने दरात तेजी राहिली. डाळिंबाची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माढा भागातून झाली. नजीकच्या उस्मानाबाद, पुणे, सातारा भागातूनही काहीशी आवक झाली. पण तुलनेने कमी राहिली. डाळिंबाची आवक या आठवड्यात ३१ जानेवारीला १ लाख १७ हजार २०० किलो झाली. तर डाळिंबाला प्रतिक्विंटल ८०० ते ७५०० व सरासरी २१०० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या आठवड्यात २४ जानेवारीला १ लाख १४ हजार ५६० किलो झाली, त्यादिवशी ५०० ते ६८०० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. १७ जानेवारीला आवकेत घट होती. त्यादिवशी ५४ हजार ७१ किलो आवक झाली. त्यास ५०० ६०० व सरासरी २२०० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या आठवड्यात १० जानेवारीलाही आवकेत मोठी वाढ झाली. १ लाख २६ हजार २०० किलो इतकी आवक झाली. त्यादिवशी प्रतिक्विंटल ५०० ते ६७०० व सरासरी २८०० रुपये इतका दर होता. गेल्या महिनाभरातील डाळिंबाच्या आवकेतील किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे दिसून येते. 

नागपुरात १००० ते ५००० रुपये विदर्भात सर्वदूर डाळिंब लागवडक्षेत्र वाढल्याने कळमणा बाजार समितीतदेखील स्थानिक डाळिंबाची आवक वाढती असल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची विक्री ४५ ते ५० रुपये किलोने होत आहे. डाळिंबाचे घाऊक दर १००० ते ५००० रुपये प्रति क्‍विंटलचे आहेत. कळमणा बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरला पूर्वी सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून डाळिंबाचा पुरवठा होत होता. जानेवारी महिन्यात सरासरी डाळिंबाची आवक २००० क्‍विंटलची होती. महिना संपता संपता ही आवक एक हजार क्‍विंटलवर स्थिरावली आहे. सुरवातीला आवक अधिक असल्याने दर १००० ते ४००० रुपये प्रति क्‍विंटलचे होते. त्यात वाढ होत हे दर आता कमीत कमी १०००, तर जास्तीत जास्त ५५०० ते ६००० रुपयांवर पोचले आहेत. २५ ते २७ जानेवारी या कालावधीत डाळिंब १००० ते ६००० रुपये प्रति क्‍विंटलवर गेले होते. आता हे दर ५५०० रुपयांवर स्थिरावल्याचे चित्र आहे.

नाशिकला ३५० ते ७५०० रुपये  नाशिक बाजार समितीत जानेवारी महिन्यात दररोज सरासरी २००० क्रेट अशी डाळिंबाची आवक झाली. प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ५०० ते २००० सरासरी १५०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची ४०० क्विंटल आवक असताना क्विंटलला ३५० ते ७५०० व सरासरी ४००० रुपये दर निघाले. जानेवारीच्या पहिल्या २ आठवड्यात ५००० क्रेटची आवक सुरू होती. त्यानंतर ती जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४० टक्क्यांनी घटली. वाणनिहाय बाजारभाव पाहता आरक्ताचे दर क्विंटलला २०० ते ३८०० व सरासरी २८०० असे होते. मृदुला वाणाला प्रति क्विंटलला ३०० ते ७५०० व सरासरी ४००० असे दर मिळाले. बाजारभावाची ही स्थिती गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत कायम होती. अजून १५ दिवस हेच चित्र स्थिर राहील असे बाजार समितीतील बाजार निरीक्षक मनोज झाडे यांनी सांगितले.

साताऱ्यात प्रतिक्रेट ३०० ते ४०० रुपये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १) डाळिंबाची ४० क्रेट आवक झाली आहे. डाळिंबास प्रतिक्रेट ३०० ते ७०० असा मिळाला आहे. गत महिन्यापासून डाळिंबाचे ३०० ते ७०० या दरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांतून डाळिंबाची आवक होत आहे. ४ जानेवारीस डाळिंबाची ५० क्रेटची आवक होऊन प्रतिक्रेटला प्रतिक्रेट ३०० ते ७०० असा मिळाला होता. पूर्ण जानेवारी महिन्यात डाळिंबास प्रतिक्रेट ३०० ते ७०० रुपये या दरम्यान दर स्थिर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com