‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या

‘असुरक्षित’ डाळिंब : भाग २
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’ची उद्‌भवली समस्या

पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम असण्याच्या समस्येबरोबर अाणखी एक आव्हान बागायतदारांपुढे उभे ठाकले आहे. यंदाच्या हंगामात फॉस्फोनिक अॅसिड या रसायनाचे अवशेष आढळून आल्याने निर्यातीसाठी ‘सॅंपल फेल’ झाल्याच्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. या रसायनाची कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) युरोपीय देशांकडून अत्यंत कमी म्हणजे दोन मिलिग्रॅम प्रति किलो निश्चित केल्याने त्याचे पालन करताना बागायतदारांची कसोटी पणास लागत आहे.   तेलकट डाग रोग, थ्रिप्स, मर आदी विविध किडी-रोगांंमुळे हैराण झालेल्या अनेक डाळिंब बागायतदारांना बागेचे क्षेत्र कमी करण्याची वेळ उद्‌भवली. किडी-रोगांच्या कचाट्यातून बाग वाचविण्यासाठी तसेच फळाची निर्यातक्षम दर्जा मिळण्यासाठी विविध रसायनांचा वापर तर अनिवार्य आहे. त्याचवेळी मालात त्याचे अवशेषही आढळणार नाहीत अशीही काळजी घ्यायची दुहेरी कसरत त्यांना करावी लागत आहे.  गुणवत्तेला धोका  खुपसंगी (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील डाळिंब बागायतदार अंकुश पडवळे म्हणाले, की डाळिंबात आढळणारी आणखी समस्या म्हणजे काही रसायनांच्या द्राक्षातील ‘एमआरएल’ जास्त आहेत. पण त्याच रसायनांच्या एमआरएल डाळिंबात मात्र अत्यंत कमी ठेवल्या आहेत. साहजिकच त्यांचे पालन करणे कठीण जात आहे. पावसाळी वातावरण दीर्घकाळ राहिले तर त्या काळात विविध कीडनाशके आम्हाला वापरावी लागतात. अशावेळी विविध रसायनांचे पर्याय न मिळाल्यास मालाची गुणवत्ता खराब होते. वेगळे काही रसायन वापरावे तर ‘सॅंपल फेल’ होण्याचा मोठा धोका आहे. 

‘फॉस्फोनीक’चे अवशेष आढळले  यंदाच्या हंगामात फॉस्फोनिक ॲसिडच्या अवशेषांचा आढळ ही अनेक बागायतदारांसाठी समस्या ठरली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. जोत्स्ना शर्मा म्हणाल्या, की डाळिंबात फॉस्फोनिक ॲसिड ‘एमआरएल’ पातळीपेक्षा आढळल्याची नवी समस्या आपल्याकडील प्रयोगशाळांच्या माध्यमातून पुढे आली आहे. त्यामुळे संंबंधित बागायतदारांचा माल निर्यातीसाठी पुढे जाऊच शकलेला नाही. हे रसायन वापरल्यानंतर ५२ दिवसांनंतरही त्याचे अवशेष आढळत नसल्याचे एका प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. तर, वापरानंतर ९० ते ९५ दिवसांनंतरही अवशेष आढळल्याचे अन्य प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. अवशेषांचे निदान करण्याच्या त्यांच्या पद्धतीत काही तांत्रिक त्रुटी आहेत का ते तपासले पाहिजे. 

आढळ कशातून? डॉ. शर्मा म्हणाल्या की काही कृषी रसायने हीच विघटनांच्या माध्यमातून फाॅस्फोनीक ॲसिडचा स्त्रोत आहेत. त्यादृष्टीने इथेफॉन हे वनस्पती वाढनियंत्रक तसेच ‘फोसेटील ए एल’ हे बुरशीनाशक या दोन रसायनांचा वापर केल्यास त्याद्वारे फॉस्फोनीक ॲसिडचा आढळ होऊ शकतो. काही डाळिंब उत्पादकांनी इथेफॉनचा वापर फळाचा रंग वाढवण्यासाठी काढणीच्या १५ दिवसांच्या आधी केल्याचे आढळले आहे. काही फवारणीद्वारे तर काही ड्रेंचीगद्वारे ते वापरतात. त्यामुळे या रसायनांचा वापर किती प्रमाणात, कशा प्रकारे व केव्हा केला आहे हे अभ्यासून मगच या समस्येची उकल करावी लागेल. 

डाळिंबात कमी ‘एमआरएल’  फॉस्फोनिक ॲसिडचा स्त्रोत असलेल्या ‘फोसेटील ए एल’ या बुरशीनाशकाची एमआरएल द्राक्षात १०० मिलीग्रॅम प्रति किलो आहे. मात्र फॉस्फोनीक ॲसिडची एमआरएल डाळिंबात मात्र दोन मिलीग्रॅम एवढी कमी असल्याने ती पाळणे मोठे आव्हानाचे आहे. काही शेतकरी द्राक्ष व डाळिंब असे दुहेरी पीके घेतात. त्यामुळे द्राक्षातील एमआरएल त्यांनी डाळिंबात गृहीत धरली तर ही समस्या गंभीर होऊ शकते, असे डॉ. शर्मा म्हणाल्या.

दहा शेतकऱ्यांच्या मालाचे नमुने फेल   सोलापूर जिल्ह्यातील ग्रीन हॉरीजन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अमरजीत जगताप म्हणाले, की यंदा डाळिंबात ‘फॉस्फोनिक ॲसिड’ आढळल्याच्या अनेक घटना आढळल्या आहेत. यंदाच्या हंगामात आम्ही डाळिंबाचे पाच कंटेनर नेदरलॅंडला पाठवले. त्या वेळी कंपनीच्या ५५ सभासदांपैकी १० सभासदांच्या नमुन्यांमध्ये फॉस्फोनिक ॲसिडचे अवशेष स्थानिक प्रयोगशाळेत आढळले. त्यामुळे त्यांचा माल निर्यातीसाठी पुढे जाऊ शकला नाही. अपेडामार्फत आम्हाला दरवर्षी सुमारे १८४ रसायनांचे ‘चेकींग’ करण्यास सांगितले जाते. यंदाच्या वर्षी या रसायनांची संख्या दोनशेपर्यंत होती. यंदा फाॅस्फोनिक ॲसिडचे नाव त्यात प्रथमच आले आहे. फोसेटील ए एल, फॉस्फोरीक ॲसिड अशा विविध घटकांचा वापर बागायतदार फवारणी किंवा ठिबकद्वारे करतात. नेमकी कोणती रसायने वापरल्यामुळे ‘फॉस्फोनिक ॲसिड’चे अवशेष आढळून येतात हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com