डाळिंबाची खडतर वाट

डाळिंबाची खडतर वाट
डाळिंबाची खडतर वाट

या  वर्षी उशिराच्या पावसामुळे महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान येथील डाळिंब बागांना फटका बसला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत येणाऱ्या एकूण उत्पादनात घट दिसत असली तरी सध्या डागी मालाचा पुरवठा वाढल्याने बाजारभाव घसरले आहेत. त्यातच थंडीचे प्रमाण वाढत असल्याने मागणीही घटली आहे. डागी मालाचा भर निघून गेल्यानंतर बाजार पुन्हा सावरेल. मात्र दोन महिन्यांनतरचे चित्र फारसे आश्वासक नाही.  गेल्या वर्षभरापासून वाढता उत्पादन खर्च, मागणीच्या तुलनेत जास्त होणारा पुरवठा, गुणवत्तापूर्ण मालाच्या पुरवठ्यातील घट या बाबींमुळे डाळिंबाचा बाजार फारसा किफायती राहत नसल्याचे चित्र आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादनविषयक तिसऱ्या पाहणीत देशात २०१५ - १६ मध्ये २३ लाख टन डाळिंब उत्पादन झाल्याचे म्हटले आहे. २०१६-१७ मध्ये २५.२१ लाख टन डाळिंब उत्पादन अनुमानित आहे. उत्पादनात सुमारे दहा टक्क्यांची वाढ दिसत आहे. भांडवली गुंतवणुकीच्या दृष्टीने द्राक्षापेक्षा कमी खर्चाचे पण द्राक्षाइतकेच उत्पन्न देणारे पीक म्हणून डाळिंब अलीकडच्या काळात शेतकरीप्रिय झाले आहे. सटाणा - संगमनेर - सांगोला या पारंपरिक पट्ट्याबरोबरच विदर्भ - मराठवाड्यासह राज्याबाहेर पिकाचे क्षेत्र वाढलेय. काही हंगामात तर डाळिंबाचा पुरवठा इतका वाढलाय की कांदे - बटाटे बरे अशी म्हणायची वेळ आली. तिसऱ्या दर्जाचा माल अक्षरश: २० - २५ रु. किलो भावाने जात असून, किमतींनी दहा वर्षांचा नीचांक गाठलेला दिसतो. एकाच वर्षात चांगल्या मालाची रेंज ५० ते १०० रु. प्रतिकिलो इतक्या मोठ्या भावपातळीत फिरताना दिसत आहे. बाजारातील अशाप्रकारची अस्थिरता ही परवडणारी नाही. डाळिंबाखालील क्षेत्र वाढणे आणि लहान मालाचे उत्पादन वाढणे या दोन्ही गोष्टी बाजाराच्या विरोधात जात आहेत. एक एकर क्षेत्रात बाजाराच्या मागणीप्रमाणे व पिकाच्या शास्त्रानुसार व्यवस्थित माल पिकवला तर तो चार एकराला भारी पडतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. हलकी जमीन, लांब अंतर आणि शेणखताचा पुरेपूर वापर हे सूत्र मागे पडून वाटेल ती जमीन, जवळ अंतर आणि कृत्रिम डोसांचा वारेमाप वापर अशी पद्धत सुरू झाली आहे. याने बाजारात खराब दर्जाच्या मालाचा पुरवठा वाढलेला दिसतोय. परिणामी भाव पडतात आणि कोणालाच परवडत नाही, अशी आजची स्थिती आहे. "अनुभवी व तज्ज्ञ शेतकरी कुठल्याही परिस्थिती चांगला माल पिकवतो, अडीचशे ते तीनशे ग्रॅम साईजचा माल काढतो. पण, अननुभवी शेतकऱ्याला खर्च करूनही असा माल पिकवता येत नाही. अलीकडे नव्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने एकूण पुरवठा मागणीपेक्षा जास्त होताना दिसतो," असे निरीक्षण पुण्यातील व्यापारी तानाजी चौधरी नोंदवतात. प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या, म्हणजे एक किलोत तीन ते चार नग बसतील अशा फळांना चांगला भाव मिळतो. तथापि, आजघडीला लहान आकाराच्या मालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या तर उशिराच्या पावसामुळे खराब झालेला - लहान व काळे डाग पडलेला माल बाजारात येतोय. त्यामुळे बाजार समित्यांत १२०० रु. प्रति क्रेटचा (वीस किलो) भाव ८०० रु. पर्यंत खाली आला आहे. ज्या वेळी मोठा व स्वच्छ माल बाजारात येतो, तेव्हा भावही वाढतात. व्यापारी सूत्रांच्या निरीक्षणानुसार, डाळिंबाचे खरे मार्केट हे मोठ्या आकाराच्या फळांचे आहे. दिल्ली, कोलकता, ढाका अशा महानगरांत मोठ्या मालास चांगली मागणी असते. मात्र, दिवसेंदिवस लहान मालाचे प्रमाण बाजारात वाढत आहे. त्यामुळे मार्केट खराब होत असल्याचे दिसते. हे चित्र बदलण्यासाठी ग्राहककेंद्रित उत्पादनाचे नियोजन करणे गरजेचे असून, त्याबाबत जास्तीत जास्त प्रचार - प्रसार होण्याची आवश्यकता आहे.  महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांत भांडवलदारांकडून शंभरपासून ते पाचशे एकर क्षेत्रावर होणारी लागवड ही बाजाराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मात्र, आजवरचा अनुभव पाहता मोठ्या क्षेत्रावरील डाळिंब बागा यशस्वी होण्याचे प्रमाण कमी आहे. डाळिंब हे बागकामाचे पीक आहे. दररोज त्यात काम करावे लागते. एक-दोन एकराच्या प्लॉटमध्ये स्वत: मालकालाच असे काम करणे शक्य आहे. दुसरीकडे शंभर-शंभर एकराच्या बागा या यांत्रिकीकरणावर भर देणाऱ्या असतात. प्रत्येक झाडात काम करण्यासाठीची मजुरी परवडणारी नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा मोठ्या क्षेत्रातील बागांमध्ये ग्राहकाला हव्या तशा रंग - आकाराचा माल येऊ शकत नाही. नेमकी हीच संधी लहान शेतकऱ्यांनी साधण्याची गरज आहे. मोठे प्लॉटधारक गुणवत्तेबाबत लहान शेतकऱ्यांशी स्पर्धा करुन शकत नाहीत. हेच आपले बलस्थान असून, त्यावर जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे. थोडक्यात बाजारकेंद्रित उत्पादन दररोजच्या बागकामातच शक्य आहे, हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज आहे.

- दीपक चव्हाण​ (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com