उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा शिल्लक आहे. त्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कांद्याला शासनाने १००० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दुष्काळामुळे उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.

तालुक्यातील भऊर, वाजगाव, लोहोणेर, खामखेडा, सावकी, वासोळ, मेशी, दहिवड, उमराणे, वडाळे, कनकापूर, खर्डा आदी गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा साठवून ठेवला. कारण दुष्काळ, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. काही काळ दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले. यापुढेही कांद्याचे दर वाढतील, असे भाकीत वर्तविले गेले. पोळ कांदा बाजारात आल्यानंतर उन्हाळी कांद्याचे दर वाढण्याऐवजी ते सातत्याने कमी होत गेले. मागणी घटल्यामुळे मातीमोल भावाने तो विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक बघावयास मिळाला. तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी पंढरीनाथ मेधने यांनी दोन ट्रॉली कांदा महामार्गावर ओतला. 

सदोष पीक पाहणीचा फटका 

पीक पाहणी सदोष पद्धतीने होत आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे पीक लागवडीची, उत्पादनाची चुकीची आकडेवारी पाठवली जाते. अपवाद वगळता ग्रामीण स्तरावर काम करणारे कर्मचारी मागील वर्षाच्या कागदपत्रांचा आधार घेऊन पीक पाहणीची माहिती तयार करतात. या आलेल्या माहितीच्या आधारे शासन आयात निर्यात धोरणासंबंधी निर्णय घेते. त्याचा शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागतो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. सध्या दुष्काळामुळे उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तयार कांद्याच्या रोपांनादेखील मागणी नाही. त्यामुळे रोपे लागवडीचा खर्चही वाया गेला आहे. उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची दाट चिन्हे आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com