ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही

ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही

पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू असलेली वाटचाल, आजारी पडलेल्या विविध कार्यकारी सोसायट्या आणि जिल्हा बॅंका, ठप्प झालेला कर्जपुरवठा, अशी अवस्था असलेल्या सहकार आयुक्तालयाला नवे आयुक्त देण्यात आलेले नाहीत. 

राज्याच्या कोणत्याही सनदी अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये सहकार आयुक्तपद महत्त्वाचे समजले जाते. उमेशचंद्र सरंगी, रत्नाकर गायकवाड, चंद्रकांत दळवी अशा ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सहकार आयुक्त पदावर काम केले आहे. युती सरकारच्या काळात या पदाचे महत्त्व राजकीय हेतूने कमी करण्यात आले आहे.

धडाकेबाज, ग्रामीण पतपुरवठ्याची माहिती असलेला आणि कायमस्वरूपी स्वरूपाचा आयुक्त आता दिला जात नसल्याने या धोरणाचा तडाखा राज्याच्या ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेला बसला आहे. आयुक्तपदावरून मधुकर चौधरी निवृत्त होताच अपर आयुक्त दिनेश ओऊळकर यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यांना कमी कालावधी मिळूनही चांगल्या कामाची चुणूक दाखविली होती. 

सहकार आयुक्तालयाच्या विस्कटलेल्या प्रशासकीय कामाला सर्वप्रथम चंद्रकांत दळवी यांनी दिशा दिली. त्यांच्या बदलीनंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. विजय झाडे यांना सहकार आयुक्तपद मिळाले. डॉ. झाडे यांनी स्वतःच्या कामकाजात शिस्त आणली. मात्र, राज्यभर सुरू असलेल्या सहकारातील बेशिस्तीकडे दुर्लक्ष केले. कोणतीही नवी दिशा आयुक्तालयाला दिली नाही. 

डॉ. झाडे यांच्या बदलीनंतर हुशार सनदी अधिकारी आयुक्तालयात न पाठविता सतीश सोनी यांच्याकडे आयुक्तांचे कामकाज देण्यात आले आहे. मुळात, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक असलेले श्री. सोनी यांना आधीच्याच कामाचा भरपूर ताण असताना आयुक्तपदाची जबाबदारी कशामुळे देण्यात आली, असा सवाल कर्मचारी करीत आहेत. 

सहकार खात्यात अपर निबंधक असलेल्या अधिकाऱ्यांच्या हातात आयुक्तालय सोपविल्यामुळे सध्या फक्त ढकलगाडीसारखा कारभार सुरू आहे. सरकारच्या या धोरणाचा फटका राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाला सतत बसतो आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली.   

हजारो कोटींचा कारभार अनियंत्रित 

सहकार आयुक्त या नात्याने राज्याच्या सहकार आयुक्तालयातून ज्येष्ठ सनदी अधिकारी यापूर्वी ग्रामीण आणि शहरी अर्थपुरवठा यंत्रणेचे विश्वस्त म्हणून काम बघत होते. जिल्हा बॅंका व विविध कार्यकारी सोसायट्यांवर या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या संस्था आहेत. दुसऱ्या बाजूला पतसंस्था व नागरी बॅंकांमुळे शहरी सामान्य नागरिकांना अर्थपुरवठा होतो. या दोन्ही यंत्रणांकडून हजारो कोटी रुपयांचे व्यवहार केले जातात. आयुक्तपदी शिस्तप्रिय अधिकारी नसल्याने अर्थपुरवठ्यातील अपप्रवृत्ती तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फावते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com