शेती विकासाला टपाल खात्याचा हात

टपाल खात्याच्या वतीने ग्रामीण आणि दुर्गम भागांतील शेतकऱ्यांना माती परीक्षण अत्यल्प दरात देण्याचा उपक्रम सध्या पुणे विभागात सुरू आहे. भविष्यात सर्व केव्हीकेंच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी केव्हीकेंवर नियंत्रण ठेवणाऱ्या अटारी संस्थेच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार करणार आहे. तर शेतकऱ्यांना आॅनलाइन पद्धतीने निविष्ठा खरेदीसाठी सेवेचा अधिक विस्तार करण्याचे प्रयत्न आहेत. - गणेश सावळेश्वरकर, पाेस्ट मास्टर जनरल, पुणे विभाग
पोस्टमास्टर
पोस्टमास्टर

राष्ट्रीय टपाल दिन विशेष पुणे ः मातीचे परीक्षण करूनच पिकाचे नियाेजन व्हावे, आधुनिक शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी टपाल खात्याच्या वतीने शेतकऱ्यांना अल्पदरात माती परीक्षण करून दिले जात आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, बारामती, नगर, सातारा कृषी विज्ञान केंद्रांबराेबर टपाल विभागाने सामंजस्य करार केला आहे. या सेवेबराेबरच टपाल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाजदेखील देण्याचा प्रयत्न आहे. तर आॅनलाइन खरेदी करण्यात आलेली पंप, अवजारे निविष्ठा अल्प दरात घरपाेच देत, टपाल खाते शेतकरीभिमूक हाेत आहे.   शेतकऱ्यांसाठी टपाल खात्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती पुणे विभागाचे पाेस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी ‘ॲग्राेवन’ला दिली. याबाबत बाेलताना सावळेश्‍वरकर म्हणाले, की टपाल खात्याचा शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाशी सबंध येताे. टपाल खाते ग्रामीण भागात विस्तारले आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून असल्याने आणि आजही शेतीशी संबंधित असल्याने शेतीच्या समस्या माहीत आहेत. टपाल खात्याच्या पारंपरिक सेवांबराेबरच शेतकऱ्यांना आधुनिक विज्ञानाधिष्ठित शेती करता यावी, यासाठी काेणती सेवा देता येईल याचा विचार सुरू हाेता. यासाठी शेतकऱ्यांना अल्प दरात माती परीक्षण सेवा देण्याचा प्रकल्प सुरू केला. अशी आहे माती परीक्षण याेजना

  •  टपाल विभागामार्फत गेल्यावर्षी सप्टेंबरपासून याेजनेला प्रारंभ
  •  बारामती, सातारा, श्रीरामपूर केव्हींकेद्वारे माती परीक्षण करण्यात येते.
  •  शेतकऱ्यांनी काेणत्याही टपाल कार्यालयात माती नमुने तपासणीसाठी द्यावयाचे 
  •  टपाल कार्यालयातून जवळच्या केव्हीके मध्ये नमुने पाठविण्यात येतात. 
  •  १८५ रुपयांत (१५० रुपये माती परीक्षण शुल्क ३५ रुपये टपाल खर्च) माती परीक्षण
  •  माती परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना स्पीड पाेस्टद्वारे पाठविण्यात येताे. 
  •  ही सेवा पुणे विभागातील सर्व केव्हीकेंमधून देण्याचा प्रयत्न 
  •  सेवा प्रभावीपणे देण्यासाठी ५५० पाेस्ट मास्तरांना प्रशिक्षण 
  •  वर्षभरात २०३ शेतकऱ्यांकडून माती तपासणी 
  •  बारामती ९०, सातारा ९१ तर श्रीरामपूर येथे २२ शेतकऱ्यांचा सहभाग
  • सेवेचे फायदे 

  • शेतकऱ्यांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याचा खर्च, त्रास आणि वेळ वाचला
  • अत्यल्प दरात माती परीक्षण  
  • विश्‍वासार्ह सेवा
  •  भविष्यात हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज टपाल विभागाच्या वतीने देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी हवामान विभागाशी चर्चा सुरू आहे. हवामान अंदाज पाेस्ट मास्तर आणि पाेस्टमन यांना त्यांच्या माेबाईलवर मिळणार अाहे. हा अंदाज गावातील पाेस्टाच्या फलकावर दरराेज लिहिला जाईल असा प्रयत्न आहे.   आॅनलाइन निविष्ठा वितरण सेवा सध्या आॅनलाइन खरेदी लाेकप्रिय हाेत असून, शेतीपुरक अवजारे आणि निविष्ठा आॅनलाइन खरेदी झाल्यानंतर त्याचे वितरण आणि पैसे संबंधित कंपनीला देण्याची सेवा टपाल खात्याच्या वतीने देण्यात येत आहे. यासाठी ॲग्राेस्टार, कृषी एक्स आणि शेतीगुरू या कंपन्यांसाेबत करार केले आहेत. गेल्यावर्षी केवळ ॲग्राेस्टार कंपनीची २ लाख उत्पादने टपाल खात्याच्या मार्फत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहेत. या सेवेद्वारे कंपनीला १६ काेटींची रक्कम दिली असून, टपाल खात्याला १ काेटीचे उत्पन्न मिळाले आहे.  ग्रामीण टपाल जीवन विमा याेजना टपाल खात्याची सर्वांत चांगली असणारी ग्रामिण टपाल जीवन विमा याेजना राबविण्यात येत आहे. ही याेजना इतर काेणत्याही विमा याेजनेपेक्षा अधिक लाभदायी असून, या याेजनेमध्ये विमा हप्ता आणि पॉलिसी पेक्षा जास्त घेतला जात नाही. इतर कंपन्या पॉलिसी पेक्षा जास्त प्रीमियम गाेळा करतात. हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत जास्त आहे. या विमा याेजनेत गेल्या वर्षी ५ हजार ७०० नागरिकांनी सहभाग घेऊन, २६ काेटींचा विमा उतरविला आहे.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com