पोटॅशचा मोठा तुटवडा

मी १८-२० दिवसांपासून पोटॅशसाठी रावेरात फिरत आहे. पण कुठल्याही खत विक्री केंद्रात पोटॅश मिळत नाही. रेक पॉइंटचे कारण विक्रेते सांगतात. परिणामी, महागडी विद्राव्य खते वापरून पोटॅशची गरज पूर्ण करून घ्यावी लागत आहे. - विशाल पाटील, केळी उत्पादक,केऱ्हाळे (ता. रावेर, जि. जळगाव)
पोटॅश
पोटॅश

जळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत उत्पादक कंपन्यांना खतांच्या वाहतुकीसाठी बंदरांवर रेल्वे रेक उपलब्ध न झाल्याने खतांचा पुरवठा ठप्प झाला आहे. हजारो टन खते मुंबई व गुजरातमधील तीन बंदरांवर पडून आहेत. पुणे येथील कृषी आयुक्तालयाला यासंदर्भात येथील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने माहिती दिल्यानंतर रेल्वेशी तातडीने संपर्क साधण्यात आला आहे. तरीही शुक्रवारपर्यंत (ता. १४) राज्यातील पुरवठा सुरळीत झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात पोटॅशची मोठी टंचाई असून, मागील २० ते २५ दिवसांपासून रावेर, यावलमधील कुठल्याही खते विक्री केंद्रात पोटॅशची एक गोणीही उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.  जळगाव जिल्ह्यात ५५ हजार टन पोटॅशचा पुरवठा खरिपात अपेक्षित होता. त्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिली होती. परंतु यातील ६५ टक्केच पुरवठा झाला. खत कंपन्यांनी वारंवार मागणी करूनही रेल्वे विभागाने रेक उपलब्ध करून न दिल्याने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून खतांची वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यात गुजरात, मुंबई आदी भागात तीन बंदरांवर आयातीत पोटॅश येतो. गुजरातेत दोन बंदरे असून, यातील कांडला बंदरावर सर्वाधिक आयातीत पोटॅश येतो. बंदरांवर पोटॅश आयात करून गोण्यांमध्ये भरला जातो. मग खत कंपन्या थेट बंदरांवरून पोटॅश रेल्वे रेकमध्ये भरतात. तेथून रेल्वे रेकने पाठवून संबंधित भागातील रेक पॉइंटवर (रेल्वे मालधक्का) येतो. रेक पॉइंटवर पोटॅश किंवा इतर खते ट्रकमध्ये भरून पुढे तो वितरकांकडे पाठविला जातो. गुजरातमधील दोन बंदरे व मुंबईमधील एका बंदरावरून पोटॅशची वाहतूक रेल्वे रेकने करायची होती. खत कंपन्यांसमोर खत पाठवणुकीसाठी रेल्वेशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. रस्ते वाहतूक खतांसाठी परवडत नाही. रेल्वे रेकशिवाय पर्याय नाही. रेल्वेने ९५ टक्के खतांची पाठवणूक विविध केंद्रशासन पुरस्कृत खत कंपन्या विविध राज्यांमध्ये करतात. परंतु रेल्वेकडून बंदरांवर रेक उपलब्ध करून दिले गेले नाहीत. एका रेल्वे रेकमध्ये २६०० टन खते वाहतुकीची क्षमता आहे. मध्यंतरी पोटॅशची मागणी कमी होती. परंतु केळी पट्ट्यात पाचोरा, चोपडा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, भडगाव येथे पोटॅशची मागील आठवड्यात मोठी मागणी वाढली. यावल, रावेर येथील कुठल्याही खत विक्री केंद्रात पोटॅश मिळत नसल्याची स्थिती आहे. ही समस्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुणे येथील कृषी आयुक्तालयास तातडीने कळविले. आयुक्तालयाने रेल्वेला पत्रव्यवहार करून रेकची मागणी केली. तरीही रेकची समस्या सुटलेली नसल्याची माहिती मिळाली. पोटॅश मिळत नसल्याने विद्राव्य स्वरूपातील महागडी खते केळी उत्पादकांना घ्यावी लागत आहेत. पुढे केव्हा पोटॅश मिळेल, हेदेखील स्पष्टपणे कुणी सांगत नसल्याचे चित्र आहे.  रेल्वेचे प्राधान्य धान्य व सिमेंटला सध्या देशात अनेक ठिकाणी पावसाचा खंड आहे. यामुळे सद्यःस्थितीत खतांच्या पुरवठ्याऐवजी रेल्वेने धान्य व सिमेंट पुरवठ्याला प्राधान्य दिले. यामुळे रेल्वे रेक खत वाहतुकीसाठी खत कंपन्यांना मिळाले नाही. परंतु, पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात सुमारे सात हजार टन पोटॅशचा पुरवठा खत कंपन्या करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.  

प्रतिक्रिया पोटॅशचा पुरवठा खत कंपन्यांकडून व्हायला अडचण नाही. परंतु खत कंपन्यांना रेल्वेकडून रेक उपलब्ध झाले नाहीत. याची माहिती आम्ही कृषी आयुक्तालयातील खते विभागाशी संबंधित उपसंचालक यांना दिली. तेथून रेल्वेशी संपर्क साधण्यात आला. लवकरच खतपुरवठा सुरळीत होईल. जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यातच पोटॅशची अडचण आहे. इतर भागात मात्र पोटॅश शिल्लक आहे. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com