चार हजार एकरांतील बटाटा पीक गेले वाया

बटाटा पिकाचे नुकसान
बटाटा पिकाचे नुकसान
मंचर, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात सातगाव पठार परिसरातील सात गावांमध्ये गेले आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीयोग्य झालेले बटाटा पीक जमिनीतच सडू लागले आहे. चार हजार एकर क्षेत्रातील बटाटा पीक वाया गेले. पेठ व पारगावमध्ये अधिक नुकसान झाले आहे. एक हजार ५०० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 
 काढणी झालेल्या बटाट्याच्या आरणी शेतात लावल्या होत्या. आरणीतील बटाटेही सडत आहेत. हवामानातील बदलाचाही दुष्परिणाम बटाटा पिकावर झाला आहे. कुरवंडी, पेठ, पारगाव, भावडी, कोल्हारवाडी, थुगाव, कारेगाव ही सात गावे बटाट्याची आगार म्हणून ओळखली जातात. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसावर दरवर्षी सहा हजार एकर क्षेत्रात शेतकरी बटाटा पीक घेतात. सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयीकृत बॅंका, हुंडेकरी व्यावसायिक व काही कंपन्यांमार्फत बटाटा पिकासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो.
जूनमध्ये बटाटा लागवड झाली. बटाटा पिकासाठी शेतकऱ्यांनी एकरी ४५ ते ५० हजार रुपये गुंतवणूक केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून बटाटा काढणीची कामे सुरू होती. काही शेतकऱ्यांनी काढलेल्या बटाट्याची साठवणूक शेतातच आरण लावून केली होती. तर काही शेतकरी बटाटा काढणीच्या नियोजनात मग्न होते.
परंतु गेले आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले. काढणी योग्य झालेले बटाटे जमिनीतच सडून गेले आहेत. तशीच अवस्था आरणीतील बटाट्याचीही झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आरणीतील बटाटे तसेच पडू दिले आहेत. शेतात सडून गेलेले बटाटे काढण्याची इच्छा नाही’, असे प्रगतिशील शेतकरी जयसिंग एरंडे यांनी सांगितले.
पारगाव येथे बाळासाहेब सावंत, गेणभाऊ भागडे, धोंडिभाऊ भागडे, सुदाम भागडे, तुषार पवळे व पेठ येथे भिकाजी धुमाळ, बबनराव धुमाळ, बाळासाहेब रागमाले, राम तोडकर, भगवान तळेकर, शरद सणस आदी शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. ‘‘नुकसानाचे त्वरित पंचनामे महसूल खात्याने करावेत.’’ अशी मागणी जयसिंग एरंडे, पेठचे उपसरपंच संतोष धुमाळ व शरद एरंडे यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com