विक्री व्यवस्थेतील त्रुटींमुळे ब्रॉयलर्सच्या मंदीत भर

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

ब्रॉयलर पोल्ट्री मार्केटमध्ये लीन पीरियडची सुरवात झाली असून, येणारा कालावधी कसोटीचा आहे. अशा स्थितीत पोल्ट्री उद्योगाने विक्री व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्यास नुकसानीची तीव्रता कमी करता येईल, असे जाणकारांनी म्हटले आहे.

नाशिक विभागात शनिवारी (ता. २१) ५५ ते ५६ रुपये प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. नाशिकस्थित पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की मोठ्या वजनाच्या पक्ष्यांची उपलब्धता अधिक आहे. आषाढी एकादशीनंतर शुक्रवारी गुरुपाैर्णिमा आहे. गटारी अमावस्येपर्यंत बाजारावर पुरवठ्याचा दबाव राहणार आहे. अशावेळी जर किरकोळ विक्रेत्यांनी लिफ्टिंग भावाच्या सूत्रानुसार चिकनचे दर घटवले तर ग्राहक आकर्षित होतील.

डॉ. फडके म्हणाले, की गटारीनंतर शिल्लक मालाचे प्रमाण कमी राहिले, तर श्रावणात बाजारभावावर फारसा दबाव राहणार नाही. ब्रॉयलर्स मार्केटच्या दृष्टीने लीन पिरियडची सुरवात झाली आहे. अशावेळी इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सनी पॅनिक सेलिंग टाळून संयमाने, एकीने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. गटारीनंतर ओपन फार्मर्सकडे फार थोडा माल शिल्लक राहणार आहे. आजघडीला चिक्स रेट १४ रुपये प्रतिनग असून, या स्वस्ताईमुळे प्लेसमेंटमध्ये वाढ होईल. पुढील काळात पुरवठावाढ शक्य आहे. ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी हा कसोटीचा कालावधी असेल, असे डॉ. फडके यांनी स्पष्ट केले.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण यांनीही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधले. सध्या मागणीच्या प्रमाणात अधिकची पुरवठा वाढ ही समस्या आहेच; पण विक्रीचे योग्यप्रमाणात नियोजन नसल्यानेही परिस्थिती बिघडली आहे. संस्थात्मक क्षेत्राकडून त्यांच्या मार्केटिंग क्षमतेचा उपयोग केला जात नाही, असे सांगून कृष्णचरण म्हणाले, की गेल्या आठवड्यात मुंबईतील पाऊसमानामुळेही मार्केट काही प्रमाणात प्रभावित झाले. दक्षिण भारतातील बाजारभाव ६८ ते ७० रुपये प्रतिकिलो दरम्यान असून, मुंबईच्या तुलनेत ते १२ ते १३ रुपये अधिक आहेत. आषाढी एकादशीनंतर बाजारात थोडीफार सुधारणा होऊ शकते.

खडकेश्वर हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, की गेल्या पंधरवड्यात ब्रॉयलर्स पक्ष्यांना उठाव चांगला होता. मात्र, विक्रीच्या दबावामुळे रेट कमी झाले. उपवासाच्या दिवशी - सोमवारी आषाढी एकादशी आल्यामुळे खपावर फारसा परिणाम झाला नाही. बोर्ड रेट १२० ते १४० दरम्यान असल्याने आषाढ महिन्यातील पहिल्या रविवारी ( ता. २२) चिकन विक्री चांगली झाली. मुंबईतील पाऊसमान कमी झाल्यामुळे वाहतूक व विक्री सुरळीत आहे. पक्ष्यांची वजने नियंत्रणात आहेत. ओपन फार्मर्सनी चालू आठवड्यात संयमित विक्री करावी. या वर्षी महाराष्ट्रासहित गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या चार राज्यांनी श्रावणासाठी संतुलित प्रमाणात प्लेसमेंट केली आहे. त्यामुळे श्रावणात बाजार बरा राहण्याची अपेक्षा आहे.  

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ५६ प्रतिकिलो  नाशिक
चिक्स   १५ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज १६  प्रतिनग  मुंबई
अंडी  ४५७ प्रतिशेकडा    पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com