बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट प्रभावित

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन
मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि ब्रॉयलर्सचे बाजारभाव सातत्यपूर्ण तेजीत आहेत. कच्च्या मालाचे नियंत्रित दर, बाजारातील वाढती मागणी, यामुळे पोल्ट्री उद्योगाच्या नफ्यात चांगली वाढ झाल्याचे दिसतेय.
 
रविवारी (ता. २१) बेंचमार्क नाशिक विभागात ७६ रुपये प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. आठवडाभरात चार रुपये प्रतिकिलोने बाजार नरमला आहे. वातावरणातील बदलामुळे पक्ष्यांची उत्पादकता घटली आहे. यामुळे पॅनिक सेलिंग होत असून, परिणामी बाजार नरमला आहे. याशिवाय मागील दोन रविवारी धार्मिक कारणांमुळे मालास अपेक्षित उठाव न मिळाल्यामुळेही बाजारात नरमाई असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. अजय देशपांडे यांनी बाजारासंदर्भात निरीक्षणे मांडली. ते म्हणाले, की फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारात ६८ ते ७२ अशी बाजारभावाची रेंज दिसू शकते. त्याचे कारण जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मालाची उपलब्धता वाढेल असे दिसतेय. मात्र, सध्याच्या काळात प्रतिकूल हवामानामुळे जे पॅनिक सेलिंग सुरू आहे, त्यामुळे शिल्लक मालाचे प्रमाण कमी होऊ शकते. म्हणूनच ओपन फार्मर्सनी सजग राहून चांगले व्यवस्थापन केले तर त्यांना चांगला मोबदला मिळण्यासारखी परिस्थिती दिसते. सध्याच्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीवर जो मात करेल, त्याला किफायती मोबदला मिळू शकतो.
 
देवळा सप्तशृंगी अॅग्रोचे संचालक मनोज कापसे म्हणाले, की मध्य प्रदेशातील इंदोर विभागात ८५ रुपये प्रतिकिलोने लिफ्टिंग सुरू आहे. याचबरोबर राजस्थानातील अजमेरा जयपूर, हरियाणा अशा उत्तर भारतातील महत्त्वाच्या विभागातही उंचावला आहे. मध्य प्रदेशसह एकूण उत्तर भारतात मधल्या काळात थंडीच्या लाटेमुळे उत्पादकता कमी झाली आहे.
 
अलीकडेच वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य समस्यांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे एकूण पुरवठा नियंत्रणातच राहील. त्यामुळे उत्तरेतील बाजार सध्याच्या पातळीवरून कमी न होता उलटपक्षी वाढत जाण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात अल्पअवधीसाठी - पुढील दोन आठवड्यांचा विचार करता बाजार सकारात्मक राहील. फेब्रुवारी-मार्चमध्ये बाजारात पुरवठा वाढण्याचे चित्र असले तरी सध्याच्या वातावरणामुळे ते बदलू शकते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
 
गुजरात राज्यातील आणंद येथील पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल म्हणाले, की आठवड्याच्या अखेरीस शनिवारी (ता. २०) रोजी ८६ रुपये प्रतिकिलोने आणंद विभागातून लिफ्टिंग झाले आहे. मागील दोन महिन्यांत प्लेसमेंट कमी होते. त्यामुळे जानेवारीत बाजार चांगला होता. अल्पावधीत हवामानाशी संबंधित विक्रीमुळे थोडी नरमाई दिसत असली तरी आणंदमधील बाजार ७५ रुपये प्रतिकिलोच्या खाली जाणार नाही. कारण गुजरात राज्यातील मागणीच्या प्रमाणात पिलांचा पुरवठा झालेला नाही. परिणामी बाजारातील पुरवठा नियंत्रित आहे."
 
औरंगाबादस्थित खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर यांनी दक्षिण भारतातील बाजाराबाबत सांगितले, की कर्नाटक कथित बर्ड फ्लूच्या धास्ती व गैरसमजामुळे खप कमी झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. येत्या काळात २६ जानेवारी या राष्ट्रीय सणानिमित्त असणारे उत्सवी वातावरण, जोडून येणाऱ्या सुट्यांमुळे संस्थात्मक मागणी वाढेल आणि दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील बाजार पुन्हा सावरेल. महाराष्ट्रातील वजनरुपी पुरवठा नियंत्रणात येत बाजारभावात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
 
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ७६ प्रतिकिलो नाशिक
अंडी ४२० प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४६ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३५ प्रतिनग मुंबई
मका १२७२ प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २५,४०२ प्रतिटन इंदूर

 

 
 
 
 
 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com