उन्हाळ्याचा प्रभाव; ब्रॉयलर्सच्या बाजारात सातत्यपूर्ण तेजी

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन
येत्या पंधरवड्यातही ब्रॉयलर्सच्या बाजारातील तेजी टिकून राहील. मात्र, सध्याच्या कमीत कमी ८० ते जास्तीत जास्त ९० रु. प्रतिकिलो या दर पातळीत बाजारभाव फिरत राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
नाशिक विभागात शनिवारी (ता. १२)  ८६ प्रतिकिलो रु.ने ब्रॉयलर्सचे लिफ्टिंग झाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव ६ रु. प्रतिकिलोने नरमले असले तरी एकूण तेजीत सातत्य आहे. या संदर्भात सप्तशृंगी अॅग्रोचे संचालक मनोज कापसे म्हणाले, " यापुढील काळात महाराष्ट्रातील ब्रॉयलर मार्केट ८० ते ९० रु. प्रतिकिलो या रेंजमध्ये राहील. उत्तर भारतात पुरवठा वाढला आहे. गुजरात-मध्यप्रदेश या राज्यांतील दर महाराष्ट्राच्या समकक्ष आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बाजाराला ९० च्या वर चाल मिळत नसली तरी एकूणच मर्यादित पुरवठ्यामुळे पुढच्या पंधरा दिवसांत ८० रु. च्या खालीही बाजार जाण्याची शक्यता दिसत नाही."
 
पुणे विभागासाठी धोक्याचा इशारा : गेल्या काही वर्षांपासून पुणे विभागात उन्हाळ्यात प्रतिपक्षी उत्पादकता वेगाने घटत आहे. खासकरून एप्रिल ते जून या कालावधीत पुणे विभागातील एकूण वजनरूपी उत्पादनात लक्षणीय घट होतेय. उन्हाळ्यातील तापमानाशी निगडित विषाणूजन्य साथींपुढे पक्षी टिकाव धरत नसून, प्रतिकारशक्तीत लक्षणीय घट दिसत आहे. " यापूर्वी केवळ नाशिक विभागात उन्हाळ्याच्या प्रभावामुळे नुकसान होत होते. मात्र, काही वर्षांपासून पुणे विभागातही नुकसान वाढले आहे. ब्रॉयलर पक्ष्यांची वाढती संख्या (उत्पादन) यास जबाबदार आहे. यामुळे ''मास इम्युनिटी'' कमी झाली आहे.
 
या पार्श्वभूमीवर, सामूहिक लसीकरण, ऑन इन ऑल आऊट पद्धत सर्वांनी राबवणे, काही काळ सामूहिकरित्या उत्पादन बंद ठेवणे आदी पर्याय हाताळावे लागणार आहेत. उत्पादकता कमी होण्याच्या भीतीने एकाच वेळी माल बाजारात येणे आणि त्यामुळे दर कमी होण्याच्या प्रकारांतही वाढ झाली आहे, असे निरीक्षण पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. नीलेश राऊत यांनी नोंदवले आहे. 
 
आठवडाभरात एका दिवसाच्या पिल्लांचे बाजारभाव प्रतिनग १ रुपयाने वधारला आहे. हॅचिंग एग्जचे भाव स्थिर आहेत. टेबल एग्जचे भाव आठवड्याभरात प्रतिशेकडा २२ रु. नरमले आहेत.
 
या संदर्भात योजना पोल्ट्रीचे संचालक राजू भोसले म्हणाले, "उन्हाळ्याच्या प्रभावामुळे पुढील आठ दिवस अंड्यांच्या बाजारात नरमाई दिसेल. पण, मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून बाजार पुन्हा वरच्या दिशेने जाऊ शकतो. दरवर्षी जूनपासून पुढे अंड्याचा खपात वृद्धी पाहायला मिळते, हे त्यामागील कारण होय. विशेष म्हणजे, या वर्षी प्रथमच उन्हाळ्यात बाजारभाव किफायती राहिले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत उन्हाळ्यात हमखास उत्पादन खर्चाच्या खाली बाजार जात असे. आजघडीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत सात ते आठ टक्क्यांनी बाजारभाव किफायती आहे."
 
ब्रॉयलर्सच्या किरकोळ खपाबाबत श्री. भोसले म्हणाले, " सामान्यपणे दर रविवारी ७० टक्के चिकनविक्री ही सकाळच्या सत्रात होत असते. कारण, रविवारच्या सुटीमुळे जास्त करून दुपारच्या वेळेस चिकन खाणे पंसत केले जाते. तथापि, उन्हाळ्यात चिकनचा खप कमी होतो. त्याचा सर्वाधिक परिणाम रविवारच्या सकाळच्या सत्रातील मागणीवर होते. सध्या, तापमानवाढीमुळे ब्रॉयलर पक्ष्यांचा वजनरूपी पुरवठा संतुलित झाल्यामुळे तेजी आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे रविवारसह एकूणच किरकोळ मागणी ही हंगामी कारणांमुळे फारशी उत्साहवर्धक नाही. 
 
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ८६ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३७ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २५ प्रतिनग मुंबई
अंडी ३३५ प्रतिशेकडा पुणे

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com