वर्षातील उच्चांकी पातळीवरून ब्रॉयलर्स बाजार नरमला

दोन किलोच्या आतील वजनाच्या पक्ष्यांना दहा रुपये कमी दर देण्याची नवीनच प्रथा रूढ होत आहे. अशा प्रथांचा पोल्ट्री उद्योगाने स्वीकार करू नये, त्यांना त्वरित पायबंद घालावा. - डॉ. अनिल फडके, पोल्ट्री उद्योजक, नाशिक
साप्ताहिक पोल्ट्री समालोचन
साप्ताहिक पोल्ट्री समालोचन

गेल्या आठवड्यात उच्चांकी भावपातळीवरून ब्रॉयलर्सचा बाजार प्रतिकिलोमागे १३ टक्क्यांनी नरमला आहे. दुसरीकडे, टेबल एग्जच्या भावात सात टक्क्यांनी वाढ झाली.

नाशिक विभागात शनिवारी (ता. २७) ८४ रुपये प्रतिकिलो ने ब्रॉयलर्सचे लिफ्टिंग झाले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव १३ टक्क्यांनी नरमले आहेत.

बाजाराची सद्यःस्थिती आणि पुढील वाटचालीबाबत पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘गेल्या आठवड्याच्या शेवटी नाशिक विभागात २.२ किलो वजनाच्या पक्ष्यांना ८४ ते ८५ दरम्यान बाजारभाव मिळाला. अलीकडेच दीड ते दोन किलो वजनाच्या पक्ष्यांना १० रुपये कमी दर मिळण्याची अनिष्ट पद्धत रूढ होताना दिसत आहे. अन्य राज्यांत संबंधित लहान व मोठ्या पक्ष्यांच्या किमतीत १ ते २ रुपयांचा फरक असतो. महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाने अशा प्रकारची अनिष्ट प्रथा बंद पाडली पाहिजे.

खरे तर पावणेदोन ते दोन किलो वजनाच्या पक्ष्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. अशा पक्ष्यांना किफायती दर मिळण्याऐवजी त्यांचे मार्केट खराब केले जातेय. गेल्या महिन्यात दीड ते दोन किलोच्या आतील पक्ष्यांच्या वाढत्या पुरवठ्यामुळे कदाचित ही पद्धत रूढ झाली असावी. तथापि, अशा पद्धतींना आळा घातला पाहिजे.’

डॉ. सीताराम शिंदे म्हणाले, ‘सध्या वातावरण बदलतेय. येत्या आठवड्यांत उष्म्याचा प्रभाव कमी होऊन वजने पूर्ववत होतील. गेल्या आठवड्यांत तापमानवाढीमुळे पॅनिक सेलिंग झाले आणि ९७ वरून ८४ रु. पर्यंत बाजार उतरला. मागील दोन महिन्यांत ज्या ओपन फार्मर्सचे व्यवस्थापन उत्कृष्ट होते, त्यांना चांगला नफा मिळाला आहे. तथापि, जून महिन्यात प्लेसमेंट करताना सावधगिरी बाळगावी. सध्याची प्लेसमेंट ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघेल. या दरम्यान पावसामुळे उष्णता कमी होऊन पक्ष्यांचे वजनरूपी उत्पादन वाढेल. सध्याचा वाढता उत्पादन खर्च पाहता जुलैमधील बाजार कितपत किफायती ठरेल, याबाबत शंकाच आहे.’

तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, मागील दोन महिने ओपन फार्मर्ससाठी किफायती ठरली असली तरी करार पद्धतील काही शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. तीव्र उन्हाळा आणि विषाणूजन्य प्रादुर्भावामुळे ब्रॉयलर कोंबड्यांची उत्पादकता घटली. उदा. चार हजार पक्ष्यांच्या लहान युनिटमधून जेथे दहा हजार किलो माल निघत होता. तेथे आता सात हजार किलो मालाचे उत्पादन होतेय.

यामुळे प्रतिकिलो खाद्याचे प्रमाण (एफसीआर) वाढते. पर्यायाने उत्पादन खर्च वाढतो. अशा परिस्थितीत करार पद्धतीतील लहान युनिटधारक शेतकऱ्याला जेथे प्रतिकिलो चार ते सहा रुपये मोबदला मिळत होता, तो सध्या एक ते दोन रुपयांपर्यंत उतरला आहे. तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याचे यावरून दिसते.

खाण्याच्या अंड्यांचे भाव ७ टक्क्यांनी वधारले आहेत. दरवर्षी १५ मेनंतर भाववाढीचा ट्रेंड या वर्षीही कायम राहिला. यंदाच्या संपूर्ण उन्हाळ्यात प्रथमच उत्पादन खर्चाच्या वर दर मिळाले आहेत. पुढील काळात वातावरणातील थंडावा आणि पावसाळी हवामानामुळे अंड्यांच्या खपवाढीला आणखी चालना मिळेल.

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ८४ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३७ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २५ प्रतिनग मुंबई
अंडी ३८५ प्रतिशेकडा पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com