शेळके यांचा ‘ग्रीन ए वन’ अंडी उत्पादनाचा ब्रॅंड

संदीप शेळके यांच्या धामणगाव बढे येथील युनीटमध्ये ८० हजार कोंबड्यांचे पालन केले जाते
संदीप शेळके यांच्या धामणगाव बढे येथील युनीटमध्ये ८० हजार कोंबड्यांचे पालन केले जाते

बुलडाणा येथील संदीप शेळके या तरूणाने लेअरच्या सुमारे पंधराशे पक्ष्यांच्या संगोपनाला सुरवात केली. आज दररोज एक लाख पक्ष्यांच्या विक्रीपर्यंत व्यवसायाचा विस्तार केला आहे. अन्य शेतकऱ्यांसोबत अंडी उत्पादनासाठी करार करीत हा जिल्हा अंडी उत्पादनाचे हब तयार करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. ग्रीन अग्रो बाजार एक्सपोर्ट या कंपनीची स्थापना व ग्रीन ए वन एग्ज हा अंड्यांचा ब्रॅंड बनवला आहे.    बुलडाणा येथील संदीप शेळके यांची शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी आहे. धामणगाव बढे परिसरातील आपल्या शेतीत त्यांनी पाच एकरांवर लेअर कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. सन २०१३ पासून हा व्यवसाय टप्प्याटप्प्याने वाढवला. स्वतः कडील पक्षी संगोपनाची शेडस त्यांनी वाढवली. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांसोबतही करार करीत अंडी घेण्यास सुरवात केली. 

अंडी उत्पादनाची मोठी क्षमता  ग्रीन अग्रो बाजार एक्सपोर्ट या कंपनीची स्थापना शेळके यांनी केली आहे. त्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांसोबत त्यांनी अंडी उत्पादनासाठी करार केला आहे. हा करार सुमारे सहा वर्षांसाठी असतो. शेळके यांचे स्वतःचे नाशिक येथे प्रत्येकी १० हजार पक्षी उत्पादनाचे चार शेडस आहेत. त्याद्वारे सुमारे ४० हजार पक्षांचे उत्पादन घेण्याची क्षमता तयार केली आहे. त्याचबरोबर बुलडाणा येथे प्रत्येकी २० हजार पक्षी उत्पादनाचे चारशे शेडस आहेत. त्याद्वारे ८० हजार पक्षी उत्पादनाची क्षमता तयार केली आहे. आज त्यातूनच स्वतःकडील तसेच शेतकऱ्यांकडील उत्पादन पाहाता दिवसाला एक लाख अंडी विक्री करण्यापर्यंत क्षमता त्यांनी विकसित केली आहे. बुलडाणा व औरंगाबाद जिह्यांत त्यासाठी बाजारपेठही तयार केली आहे. 

कराराची पद्धत  करार शेती सध्या चार शेतकऱ्यांचे शेडस कार्यरत आहेत. सुमारे २० शेतकऱ्यांकडे शेड उभारणी सुरू अाहे. सध्याच्या कराराप्रमाणे शेडनिर्मिती व पहिली बॅच सुरू करण्यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. हा पैसा आर्थिक संस्थांकडून मिळवून देण्यासाठी ग्रीन अग्रो कंपनी मदत करते. यात १५ अाठवडे वयाचा पक्षी शेतकऱ्याला दिला जातो. तो सुमारे २० अाठवड्यांचा झाला की अंडी द्यायला सुरवात करतो. ७२ अाठवड्यांपर्यंत तो नियमितपणे अंडी देत राहतो. कोंबड्यांना लागणारे खाद्य शेळके यांच्या कंपनीतर्फे पुरवले जाते. वैद्यकीय सल्ला तसेच उपचार देणारे तज्ज्ञ कायम उपलब्ध असतात. दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. 

बुलडाणा अंडीनिर्मितीचे हब  अंड्यांची एकूण बाजारपेठ लक्षात घेता शेळके यांनी बुलडाणा जिल्ह्यात लेअर कोंबडी संगोपनाचे सुमारे ५०० शेडस उभे करण्याचे ध्येय ठेवले अाहे. यासाठी त्यांची ‘टीम’ कार्यरत आहे. या सुविधेमुळे बुलडाणा जिल्ह्यात दररोज पाच लाख ते १० लाखांपर्यंत अंडी उत्पादनाची क्षमता तयार होईल असे शेळके यांचे म्हणणे आहे. 

उत्पादन ते विक्रीपर्यंत पाठीशी  छोट्या शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून अंडी उत्पादनाकडे वळवण्याचे काम शेळके करीत अाहेत. छोट्या शेतकऱ्याला दोन हजार कोंबडी उत्पादन क्षमतेचा फार्म सुरु करून देण्याची मदत करतानाच या विक्रीचीही जबाबदारी शेळके सांभाळतात. शेतकऱ्याने केवळ कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे अपेक्षित अाहे. अंडी विक्रीतून दररोज पैसा येत राहतो. त्यातून काही रक्कम वळती करून शेतकऱ्याच्या नावे बॅंकेच ठेवण्यात येते. जेव्हा पक्ष्यांची पुढील बॅच सुरू करावी लागते अशावेळी ही रक्कम शेतकऱ्यांच्या उपयोगी पडते अशी व्यवसायाची रचना करण्यात अाली अाहे. हे मॉडेल उभे करण्यापूर्वी राज्यात फिरून या क्षेत्राचा अभ्यास शेळके यांनी केला. नाशिक भागातील तज्ज्ञांशी चर्चा केली. 

खाद्यनिर्मितीत स्वयंपूर्णतः  कोंबड्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना लागणारे खाद्य धामणगाव बढे फार्मवर तयार केले जाते. या ठिकाणी त्याचे युनिट उभारले अाहे. वर्षाला सुमारे २५ हजार क्विंटल मका त्यासाठी लागतो. मका स्थानिक शेतकरी, बाजारपेठांमधून खरेदी केला जातो. शेळके यांच्या या युनिटमध्ये ३० कर्मचारी कार्यरत आहेत. शेडमध्ये सर्व अत्याधुनिक व्यवस्था आहे. स्वयंचलित यंत्रणाही तयार केली आहे. उन्हापासून पक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी आधुनिक फॉगर्सही बसविले आहेत. 

पॅकिंग व मॉलमध्ये अंडी विक्री  शेळके यांनी औरंगाबाद येथील माॅलमध्ये अंडी विक्रीस ठेवली आहेत. ग्रीन ए वन एग्ज या नावाने त्यांनी अंड्यांचे पॅकिंग व ब्रँडिंग केले अाहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत अहे. पॅकिंग युनिटही उभारले आहे. कंपनीच्या नावाने निर्यातीचा परवानाही काढला आहे. ग्रीन अग्रो बाझार एक्सपोर्टस नावाने ही कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे सेंद्रिय उत्पादने, धान्य खरेदी, अंडी मार्केटचा विस्तार असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार अाहेत. 

अडचणींवर मात  शेळके यांना प्रकल्पासाठी सुमारे सहा ते सात कोटींचे भांडवल उभारावे लागले. टप्प्याटप्प्याने व्यवसायाची उभारणी, त्यातून उत्पन्न व कर्ज परतफेड अशाप्रकारे बॅंकेत पत तयार करावी लागली. या व्यवसायातील अडथळा सांगायचा तर दोन हजार कोंबड्यांचे युनिट उभारण्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद बँकेमार्फत करायची असेल तर बँकांकडून ‘एनए’ झालेले प्लॉटस हवेत अशी मागणी केली जाते. शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी बॅंका सहजासहजी तयार होत नाहीत. पतसंस्था किंवा खासगी बॅंकांचे स्त्रोत वापरायचे तर व्याजदर अधिक असतात. 

संदीप शेळके- ९६८९५५३३३३  प्रसाद मुक्ताळकर-७८८८०११२३८  प्रकल्प व्यवस्थापक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com