वाढत्या पुरवठ्यामुळे ब्रॉयलर बाजारात नरमाई

मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक राहिल्याने बाजार नरमला आहे. सध्या ओपन सेक्टरकडेही स्टॉक शिल्लक असून, त्याचा दबाव बाजारभावावर आहे. - डॉ. अनिल फडके, संचालक​, व्हिनस पोल्ट्री, नाशिक
पोल्ट्री विश्लेषण
पोल्ट्री विश्लेषण

पुणे ः ऐन रविवारी उपवासाचे दिवस आणि वाढता पुरवठा यामुळे दोन आठवड्यांपासून बाजारभावात नरमाई आहे. चालू आठवड्यात दिवाळीतील खपामुळे शिल्लक माल निघून जाईल व त्याने थोडा आधार मिळेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्रॉयलर मार्केटसाठी बेंचमार्क असलेल्या नाशिक विभागात रविवारसाठी ६६ रु. प्रतिकिलो भावाने ब्रॉयलर पक्ष्यांचे फार्म लिफ्टिंग झाले. ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा बाजारभावाच्या दृष्टीने निराशजनक ठरला आहे. गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशभरात ब्रॉयलर पक्ष्यांचा बाजारभाव जवळपास एकसमान पातळीवर आहे. खासकरून महाराष्ट्रासाठी गुजरात, मध्य प्रदेशात बाजारभावाच्या दृष्टनीे फारशी पडतळ बसत नाही. देशातील सर्वच उत्पादन विभाग स्थानिक मागणीच्या तुलनेत सक्षम होत असल्याचे यातून दिसते. नाशिक येथील व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘‘मागील आठवड्यातील रविवारी (ता. ८) संकष्ट चतुर्थी आणि कालच्या (ता. १५) रविवारी एकादशी आली. दोन्ही सर्वाधिक खपाच्या दिवशी उपवास आल्याने घरगुती खप मोठ्या प्रमाणावर कमी राहिला. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक राहिल्याने बाजार नरमला आहे. सध्या ओपन सेक्टरकडेही स्टॉक शिल्लक असून, त्याचा दबाव बाजारभावावर आहे. चालू आठवड्यात दिवाळीतील मागणीमुळे शिल्लक माल वेगाने निघून जाईल, परिणामी बाजारात सुधारणा अपेक्षित आहे.’’ पोल्ट्री ब्रिडर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर म्हणाले, की अपेक्षेप्रमाणे पक्ष्यांच्या वजनात वाढ दिसत असून, त्याचाच प्रभाव संपूर्ण देशभरातील बाजारावर दिसत आहे. उद्योगातील सर्वच जण बाजाराविषयी सारखाच विचार करतात तेव्हा येणारा परिणाम विरुद्ध असतो. सध्या लहान पक्ष्यांना बाजारात ‘प्रीमियम’ मिळत आहे. हे चित्र पुरेसे बोलके आहे. बाजार किफायती होण्यासाठी पक्ष्यांची वजने नियंत्रणात ठेवणे, जास्तीत जास्त माल काढत राहणे हाच सयुक्तिक पर्याय आहे.’’ गेल्या आठवड्यात इंदोर बाजारात सोयामिलच्या दरात पाच वर्षांचा नीचांक गाठला. दुसरीकडे ऐन ऑफसीझनमध्येच मक्याचे भाव नरमले आहेत. एका दिवसाच्या पिलाचे (चिक्स) दर उच्चांकी पातळीवर असून, त्यामुळे ओपन फार्मर्सचा उत्पादन खर्च वाढला आहे. सध्या कच्चा माल रास्त दरात उपलब्ध असला, तरी चिक्सच्या भाववाढीमुळे सध्याचा बाजारभाव किफायती ठरत नाही, असे शेतकरी सांगतात.  मागची दिवाळी ते यंदाची दिवाळी पोल्ट्री उद्योगासाठी किफायती ठरली आहे. संतुलित पुरवठ्यामुळे बाजारभावाला चांगली दिशा मिळाली आहे. संस्थात्मक धोरणे आणि वैयक्तिक पातळीवरील स्वयंनियंत्रणामुळे बाजारात गरजेपेक्षा पुरवठा झाला नाही. ऑगस्ट ते २० डिसेंबर २०१५ या काळातील मोठ्या मंदीपासून धडा घेऊन उद्योगाने अतिरिक्त पुरवठा टाळला आहे. दरवर्षी चिकनच्या मागणीत होणारी वाढ आणि त्यानुसार संतुलित प्रमाणात उत्पादन वाढीचे धोरण यापुढे पोल्ट्री उद्योगाला राबवावे लागणार असून, त्या दृष्टीने येत्या काळातील घडामोडी बाजारभावाच्या दृष्टीने लक्षवेधक ठरतील.

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ६६     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ३६०     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४१     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३२     प्रतिनग     मुंबई
मका     १४९०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २२,८५०     प्रतिटन     इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com