अंडी, ब्रॉयलर्सच्या बाजारात सातत्यपूर्ण तेजी

अंडी, ब्रॉयलर्सच्या बाजारात सातत्यपूर्ण तेजी
अंडी, ब्रॉयलर्सच्या बाजारात सातत्यपूर्ण तेजी

पुणे : मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि ब्रॉयलर्सचे बाजारभाव सातत्यपूर्ण तेजीत आहेत. कच्च्या मालाचे नियंत्रित दर, बाजारातील वाढती मागणी, यामुळे पोल्ट्री उद्योगाच्या नफ्यात चांगली वाढ झाल्याचे दिसतेय.

शनिवारी बेंचमार्क नाशिक विभागातून 80 रुपये प्रतिकिलो या दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांची विक्री झाली. ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी गेल्या काही वर्षांत प्रथमच जानेवारीचा पंधरवडा नफ्याचा ठरला आहे. जानेवारी महिन्याचा आतापर्यंत सरासरी विक्री दर 81 रुपये राहिला आहे. डिसेंबर महिन्याचा सरासरी विक्री दर 78 रुपये आसपास होता. त्या तुलनेत जानेवारीचा पहिला पंधरवडा डिसेंबरपेक्षा चांगला राहिला आहे. डिसेंबर महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात नाताळ आणि 31 डिसेंबरमध्ये बाजारभावात चांगली सुधारणा होऊन तेजी आली होती.

गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतातील बाजारभाव 70 रुपये प्रतिकिलोच्या वर टिकून आहेत. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तेथील बाजारात प्रतिकिलोमागे 5 रुपयांची सुधारणा झाली आहे. पंजाब राज्यात एक वजनाच्या मालाचे दर 100 रुपयाच्या आसपास आहेत. गुजरात राज्यातील दर महाराष्ट्राच्या पातळीवर आहेत. तेथील जानेवारीचा सरासरी दर 84 रुपयांवर आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बाजाराला चांगला आधार मिळाला आहे.

खडकेश्वरा हॅचरिचचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, की दक्षिण भारतात अयप्पा सणाचा कालावधी संपला असून, त्यामुळे तेथील खपात यापुढे सुधारणा दिसेल. गुजरात आणि उत्तर भारतातही तेजी आहे. महाराष्ट्रात पुणे विभागातील पक्ष्यांची वजनेही नियंत्रणात येत आहेत. यामुळे पुढील पंधरवड्यात बाजारभाव किफायती राहील. एकूण महाराष्ट्राचा विचार करता 74 ते 78 दरम्यान पुढील पंधरवड्यात बाजारभावाची रेंज अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

ब्रॉयलर्समधील सातत्यपूर्ण तेजीमुळे एका दिवसाच्या पिलांचे (चिक्‍स) भाव आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. गेल्या आठवड्यात 46 रु. प्रतिनग असा सर्वोच्च दर पिलांना मिळाला आहे. पुढील काळात होळीच्या निमित्ताने प्लेसमेंट सुरू होईल. त्यामुळे पिलांना चांगली मागणी राहील. परिणामी बाजारभाव तेजीतच राहतील. हॅचिंग एग्जचे दरदेखील उच्चांकी 35 रुपये प्रतिनग या पातळीवर स्थिरावले आहेत. या दोन्हींना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक बाजारभाव मिळत आहे. अंड्यांच्या दरातही जोरदार तेजी आहे. पुणे विभागात गेल्या आठवड्यात 420 रुपये प्रतिशेकडा दराने अंड्यांचे फार्म लिफ्टिंग झाले. सध्या उत्पादन खर्च सव्वातीन रुपयांच्या आसपास असून, त्यातुलनेत तीस टक्‍क्‍यांहून अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. मागील महिन्याचा सरासरी विक्री दर 390 पैसा होता. त्या तुलनेत जानेवारीमधील बाजारभाव चांगले राहिले असून, डिसेंबरपेक्षा जानेवारीचा सरासरी विक्री दर किफायती राहील, असे दिसते.

सध्याची परिस्थिती पाहता जानेवारीचा दुसरा पंधरवडाही बाजाराच्या दृष्टीने चांगला असेल. यापुढे होळीसाठी प्लेसमेंट सुरू होईल. सणानिमित्ताने प्लेसमेंट वाढल्यास बाजारात नरमाई येते, त्यामुळे प्लेसमेंटमध्ये वाढ-घट न करता सातत्य राखावे. - सी. वसंतकुमार , अध्यक्ष, पोल्ट्री फार्मर्स ऍन्ड ब्रीडर्स असोसिएशन

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर 80 प्रतिकिलो नाशिक
अंडी 420 प्रतिशेकडा पुणे
चिक्‍स 46 प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज 35 प्रतिनग मुंबई
मका 1272 प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल 25402 प्रतिटन इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com