वाढत्या पुरवठ्यामुळे बाजारभावावर दबाव शक्य

वाढत्या पुरवठ्यामुळे बाजारभावावर दबाव शक्य
वाढत्या पुरवठ्यामुळे बाजारभावावर दबाव शक्य

देशभरात विविध कारणांमुळे ब्रॉयलर पक्ष्यांच्या सरासरी वजनात होणाऱ्या वाढीमुळे येत्या दिवसांत मालाचा पुरवठा वाढणार आहे. यामुळे बाजारभावावरही दबाव येण्याची चिन्हे आहेत. दिवाळीनंतर देशातील ब्रॉयलर्सच्या बाजारात अपेक्षित सुधारणा दिसत नसून, मागणीपेक्षा अधिक पुरवठा हे त्यामागील प्रमुख कारण दिसत आहे. उत्पादन खर्च आवाक्यात ठेवण्यासाठी पक्ष्यांची वजने वाढवण्याच्या पायंड्यामुळेही बाजारातील मागणी - पुरवठ्याचे गणित विस्कळित होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत थंडीच्या दिवसांत अनुकूल वातावरणामुळे पक्ष्यांची वजने लवकर येत आहेत. ३५ दिवसांत दोन किलो वजन आणि १.५ एफसीआर (खाद्याचे वजनात रुपांतर) हे सूत्र प्रचलित झाले आहे. पूर्वी ४२ दिवसांत मिळणारे सरासरी दोन किलो वजन आता ३८ दिवसांतच मिळत आहे. उत्तम ब्रीड, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उच्च दर्जाचे खाद्य या बाबींमुळे पक्ष्यांच्या कामगिरीत (परफॉर्मन्स) मोठी सुधारणा दिसत आहे. या बाबींमुळे बाजारात अनपेक्षितरीत्या पुरवठा वाढत असून, तो लक्षात घेऊनच उत्पादनाचे नियोजन झाले पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.  दुसरा मुद्दा, कच्च्या मालाचे दर कमी झाले असले तरी एका दिवसाच्या पिलांचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ओपन फार्मर्सचा तीन किलो वजनाचे पक्षी करण्याकडे कल आहे. ही बाबदेखील येत्या काळात बाजारात पुरवठा वाढण्यासाठी पूरक ठरेल. तिसरी बाब, संस्थात्मक क्षेत्रासाठी यंदा ब्रॉयलरचा बाजारभाव किफायती ठरला आहे. असंघटित क्षेत्राकडून ब्रॉयलर प्लेसमेंटमध्ये घट होत असली तरी संस्थात्मक क्षेत्राची गुंतवणूक वाढली आहे. यामुळे येत्या काळात ब्रॉयलर्सचे उत्पादन वाढत जाण्याची चिन्हे आहेत.   गेल्या दोन वर्षांत मे ते जुलै या काळात उच्चांकी तापमानवाढीमुळे ब्रॉयलर्स पक्ष्यांचे उत्पादन नियंत्रित होऊन बाजारभावात उच्चांकी वाढ झाली होती. थोडक्यात नैसर्गिक प्रतिकूलता असली तरच उत्पादन नियंत्रित होते. सर्व साधारण हवामानात पक्ष्यांची कामगिरी चांगली होते आणि त्या दरम्यान पुरवठा थोडा जरी अधिक झाला तरी बाजार कोसळतो, असा ट्रेंड रुजताना दिसत आहे.  गेल्या पंधरवड्यात खाण्याच्या अंड्यांच्या भावात सुमारे दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ३८० रु. प्रतिशेकडा बाजारभाव राहिला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्के बाजारभाव उंच राहिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमधील बाजारभाव सुमारे दहा टक्क्यांनी किफायती राहिला आहे. मका, सोयामिल आदी कच्च्या मालातील स्वस्ताईमुळे अंड्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. दुसरीकडे बाजारभाव उंच राहिल्यामुळे चालू तिमाहीतील मार्जिन सुधारण्यास मदत मिळणार आहे. 

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६६ प्रतिकिलो नाशिक
अंडी ४१५ प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४२ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३२ प्रतिनग मुंबई
मका १३८० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २२००० प्रतिटन इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com