दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार : ऊर्जामंत्री बावनकुळे

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषी पंपाची योजना ३ वर्षांत राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न या योजनेमुळे साकारले जाणार आहे. या योजनेसाठी शासन ३ वर्षांत ८५८.७५ कोटी खर्च करणार आहे. एक लाख सौर कृषी पंपाच्या नवीन योजनेला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता.१६) मंजुरी दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ही योजना सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ अशी तीन वर्षांत राबविली जाणार आहे. पहिल्या वर्षी २५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार व तिसऱ्या वर्षी २५ हजार या प्रमाणे शेतकऱ्यांना १ लाख कृषी पंपाचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या वीज दरापोटी शासनाला महावितरण कंपनीला अनुदान द्यावे लागते. सन २०१७-१८ मध्ये महावितरण कंपनीला ४,८७० कोटी रुपये अनुदान देण्यात आले. कृषिपंप ग्राहकांना वीजपुरवठा करताना लघुदाब वाहिनीची लांबी वाढते आहे.  परिणामी कमी दाबाने वीजपुरवठा, वीजपुरवठा खंडीत होणे, वारंवार बिघाड होणे, तांत्रिक वीज हानी टाळण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. ही योजना राबविताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सौर पंपासाठीचा खर्च विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजनेतून खर्च केला जाणार आहे.   अशी होणार अंमलबजावणी सौर पंप बसवण्यासाठी दर निश्चिती करून विभागवार पुरवठादारांचे पॅनेल तयार करण्यात येईल व शेतकऱ्यांना या पॅनेलमधील कोणत्याही पुरवठादाराकडून सौर पंप बसविता येईल. संबंधित पुरवठादारास सौर पंपाची पुढील ५ वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी पुरवठादाराची १० टक्के रक्कम राखून ठेवण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी सौर पंप बसविण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. त्यांना प्राधान्य देण्यात निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या नवीन योजनेत सर्वसाधारण गटासाठी राज्य शासनाचा हिस्सा ६७.७१ कोटींचा असेल. अनुसूचित जातींसाठी ८.३ कोटी व अनुसूचित जमातीसाठी १०.१४ कोटी शासनाचा हिस्सा असेल. शासन आणि महावितरण कर्ज उभारून शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, असे शेतकरी पात्र राहणार आहेत. तसेच अशा शेतकऱ्यांकडे पारंपरिक पध्दतीने वीज जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com