शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या निकालामधूनच उघड : होगाडे

शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या निकालामधूनच उघड : होगाडे
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या निकालामधूनच उघड : होगाडे

मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या झाकण्यासाठी आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठीच आयोगाने ४२ लाख शेतीपंपांचा नसलेला अतिरेकी वीजवापर मंजूर केला असल्याची बाब महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निकालातील आकडेवारीवरूनच उघड झाले आहे, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सोमवारी (ता. १२) सांगितले. राज्यातील उच्चदाब उपसा सिंचन योजनांना दररोज १६ तास वीज मिळते व वार्षिक वापर सरासरी किमान ३०० दिवस होतो. या योजनांचा जोडभारानुसार आणि मीटरनुसार वार्षिक वीजवापर सरासरी प्रती हॉ. पॉ. १४०४ युनिटस म्हणजे १८८२ तास होईल हे या निकालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या लघुदाब शेतीपंप वीज ग्राहकांना दिवसाकाठी सरासरी जेमतेम ६ ते ७ तास वीज मिळते आणि ज्यांचा सरासरी वार्षिक वीज वापर जेमतेम २०० दिवस होतो अशा ४२ लाख शेतीपंपांचा वीजवापर आयोगाने प्रती हॉ. पॉ. १३३३ युनिटस म्हणजे १७८७ तास याप्रमाणे मान्यता दिली आहे. दोन्हींची तुलना केली तर उच्च दाब ग्राहकांच्या तुलनेने लघुदाब पंपांचा वीज वापर दुप्पट ते अडीचपट गृहीत धरण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. आयोगाच्या निकालामध्ये इ.स. २०१८-१९ साठी उच्च दाब शेतीपंप ग्राहकांची संख्या १०३८ दाखविण्यात आली आहे. बहुतांशी सर्व ग्राहक या उपसा सिंचन योजना आहेत व सभासद खूप आहेत. त्यामुळे दररोज १६ तास वीजवापर वर्षात ३०० दिवस वा अधिक होतो. या ग्राहकांच्या जोडभारानुसार वार्षिक वीज वापर प्रती हॉ. पॉ. १४०४ युनिटस म्हणजे १८८२ तास दर्शविण्यात आलेला आहे. सर्वच ग्राहकांना मीटर असल्याने व बिलिंग अचूक होत असल्याने हा वापर बरोबर, योग्य व अचूक आहे. पण याचवेळी ज्या लघुदाब शेतीपंप वीज ग्राहकांना दररोज जेमतेम ६ ते ७ तास वीज मिळते व वापर सरासरीने वर्षभरामध्ये २०० दिवस असतो, त्यांचा वीजवापर मात्र प्रती हॉ. पॉ. १३३३ युनिटस अथवा १७८७ तास गृहीत धरण्यात आलेला आहे. या ग्राहकांची रोजची वापराची वेळ ८ तास गृहीत धरली व वर्षामधील २४० दिवस वीजवापर गृहीत धरला तरीही उच्च दाब ग्राहकांच्या तुलनेत या ग्राहकांचा वार्षिक वापर कमाल ४०% म्हणजे ५६२ युनिटस अथवा ७५३ तास यायला हवा. पण प्रत्यक्षात आयोगाने महावितरण कंपनीच्या सोयीसाठी हा वापर १३३३ युनिटस म्हणजे १७८७ तास गृहीत धरला आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे, असे होगाडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com