प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात

प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात

सातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज, आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडसी खेळांची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके, अशा अलोट उत्साहात शुक्रवारी (ता. १४) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. शुक्रवारी पहाटेपासूनच या मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमी लोकांनी हा परिसर भारून गेला होता.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आयकर विभागाचे सहसंचालक कोल्हापूर परिक्षेत्र पुर्णेश गुरुरानी, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा बांधण्यात आली.

भवानीमातेचे पुराणिक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर श्रीमती सिंघल यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली. भवानीमातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. 

छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. त्या वेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. पालखीचे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आले. शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर श्रीमती सिंघल यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले. 

यानंतर सातारा पोलिस दलाच्या बॅंड पथकाने विविध धुन वाजवून मानवंदना दिली. यानंतर शाहीर प्रभाकर आसनगावकर आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. या वेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अधीक्षक धीरज पाटील, संगीता राजापूरकर, रमेश शेंडगे, मिनल कळसकर, स्वप्नाली शिंदे, रूपाली राजपुरे, अमिता दगडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com