'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे प्रतापराव पवार यांना डी.लिट.

'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे प्रतापराव पवार यांना डी.लिट.
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे प्रतापराव पवार यांना डी.लिट.

पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना ‘डी. लिट.’ ही मानद पदवी जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या २४ मार्च रोजी होणाऱ्या एकोणिसाव्या पदवीप्रदान समारंभात पवार यांना या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उद्योग, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पवार यांना या पदवीने सन्मानित करण्यात येईल. पवार यांनी उद्योगक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे. अनेक उद्योगसमूहांच्या संचालक मंडळांत त्यांचा समावेश आहे. या क्षेत्रांतील दीर्घ अनुभवामुळे ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’चे अध्यक्षपद त्यांनी समर्थपणे भूषविले. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळात, तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या विश्‍वस्त मंडळांत पवार यांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियामक मंडळावरही (सिनेट) त्यांनी काम केले आहे.

पवार यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रेस कौन्सिलचे सदस्य, इंडियन लॅंग्वेजेस न्यूजपेपर असोसिएशनचे (भारतीय भाषिक वृत्तपत्र संघटना) अध्यक्ष, वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पेपर्सचे (वॅन) संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तसेच, विद्यार्थी सहायक समिती, बालकल्याण संस्था, पुणे अंधशाळा अशा विविध सामाजिक संस्थांच्या कामात पवार यांचे योगदान मोठे आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे १९९३ पासून विविध क्षेत्रांतील दिग्गजांना ‘डी. लिट.’ ही मानद पदवी देण्यात येते. यापूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांच्यासह अन्य मान्यवरांना या पदवीने सन्मानित केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com