अपघातग्रस्तांना विमा रक्कम देण्यासाठी प्रस्ताव पाठवा : राज्यमंत्री शिवतारे

पुणे येथे आढावा बैठक
पुणे येथे आढावा बैठक

पुणे  ः शेतकरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अपघात झाला आणि अपघात झालेल्या व्यक्तीच्या नावे शेती नसेल तरी त्याला विमा रक्कम देण्याची मागणी आमदारांनी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विमा कंपनीने तत्काळ शासनाकडे पाठवावा, अशा सूचना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या.  

पुणे जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व बैठक मंत्री शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आमदार शरद सोनवणे, बाबुराव पाचर्णे, भीमराव तापकीर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, अग्रणी बॅंकेचे मुख्य प्रबंधक आनंद बेडेकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, संजीव चोपडे, कृषी उपसंचालक विजय कानडे, चंद्रकांत भोर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. शिवतारे म्हणाले, की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवडीला चांगला प्रतिसाद आहे. फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान द्यावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी उद्दिष्ट ठेऊन काम करा. याशिवाय सेंद्रीय शेतीचा प्रयोग चांगला आहे. त्यासाठी गांडूळखत तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना निधी वाढवून देण्यासाठी ठराव करून तो शासनाला पाठवा. विंधन विहिरी व दुरुस्तीची बारामतीमध्ये सर्वाधिक कामे झाली आहे. पुरंदरमध्ये ही कामे कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अधिकारी नेमके काय करत आहे. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना नोटीस काढून अहवाल मागवा. दुष्काळी परिस्थितीत तालुकानिहाय टंचाईचे आराखडे तत्काळ मंजूर करावेत. 

जिल्ह्यात तीन ठिकाणी चारा छावण्या आहेत. मात्र, त्यातील शिरूर तालुक्यातील चारा छावणी ही सरकारकडून चालवली जाते. ही चारा छावणी कारखान्याच्या माध्यमातून चालविली जाते असे भासविले जाते. तसेच जनावरांनाही दाखल करून घेतले जात नाही, अशी तक्रार बाबुराव पाचर्णे यांनी केली. यावर श्री. शिवतारे म्हणाले, की ज्या ठिकाणी जनावरे दाखल करून घेतले जात नाही. त्या चारा छावण्यांवर गुन्हे दाखल करा. त्यानंतर तेथे ही चारा छावणी सरकारच्या माध्यमातून चालवली जाते असे फलक लावा. याशिवाय शेळ्या मेंढ्यांसाठी पुणे जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी कार्यवाही करा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com