चाराटंचाईमध्ये म्हशींना द्या मूरघास

चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा मिळण्यासाठी हिरव्या चाऱ्यापासून बनवलेला मूरघास द्यावा.
चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा मिळण्यासाठी हिरव्या चाऱ्यापासून बनवलेला मूरघास द्यावा.

उन्हाळ्यातील चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा मिळण्यासाठी हिरव्या चाऱ्यापासून बनवलेला मूरघास देणे फायदेशीर ठरते. जेव्हा मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो, त्या वेळी मूरघास बनवावा. म्हशींना पोषक तत्त्वांचा पुरवठा होण्यासाठी मूरघास चांगल्या प्रतीचा असणे अावश्यक अाहे; परंतु त्याबरोबरच तयार झालेला मूरघास जनावरांना खाऊ घालताना योग्य ती काळजी घ्यावी लागते.   हिरव्या चाऱ्यातील अन्नघटकांचा नाश न होता त्याला हवाबंद स्थितीत साठवणे या प्रक्रियेला मूरघास किंवा सायलेज म्हणतात. आवश्‍यकतेपेक्षा अधिक उत्पादन झालेला अथवा जास्त उपलब्ध असणाऱ्या हिरव्या चाऱ्यापासून मूरघास तयार करावा. मूरघासाचे नियोजन ऑक्‍टोबर ते डिसेंबर म्हणजे हिरवा चारा उपलब्ध असतो या काळात करावे.

  • मूरघासामध्ये असणारे पोषकघटक ज्या चाऱ्यापासून मूरघास केलेला आहे त्यावर अवलंबून असतात. मूरघास बनविताना जमिनीत पाणी पाझरणार नाही अशा ठिकाणी खड्डा घ्यावा.
  • खड्ड्यात पाणी गेल्यास मूरघास खराब होण्याची शक्‍यता असते. मूरघास वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येतो. दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी कच्च्यात खड्ड्यात मूरघास करता येतो.
  • प्रत्येक दूध उत्पादकाला मूरघास करता येईल अशी ही पद्धत आहे. समजा एका दूध उत्पादकाकडे पाच दुभत्या म्हशी आहेत व उन्हाळ्याच्या तीन महिन्यांच्या चाऱ्याचा प्रश्‍न आहे, अशा वेळेस दूध उत्पादकाला पुढीलप्रमाणे नियोजन करता येईल.
  • दूध उत्पादकाकडे पाच म्हशी आहेत.
  • तीन महिने म्हणजे ९० दिवसांकरिता मूरघास तयार करावयाचा आहे.
  • प्रत्येक म्हशीस दिवसाला १० किलो मूरघास याप्रमाणे दिवसाला ५० किलो मूरघास लागेल.
  • ९० दिवसांकरिता ५० किलो दररोज याप्रमाणे ४५०० किलो मूरघास बनवावा लागेल.
  • एक घनफूट खड्ड्यात (१ इंच लांब X १ इंच रुंद X १ इंच उंच = १ घनफूट) १५ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी मावते. म्हणजे ४५०० किलो मूरघास तयार करण्याकरिता ३०० घनफुटांचा खड्डा तयार करावा. खड्डा तयार झाल्यानंतर पाणी पाझरू नये म्हणून खड्ड्याच्या आकाराचा प्लॅस्टिक कागद घेऊन त्या खड्ड्यात अंथरावा, जेणेकरून खड्ड्याच्या आतील भाग संपूर्ण झाकून जाईल.
  • खड्डा पद्धतीद्वारे मूरघास तयार करावयाची पद्धत मूरघास तयार करण्याआधी चाऱ्याची कुट्टी करणे आवश्‍यक आहे. मका, कडवळ, ज्वारी, बाजरी व उसाचे वाढे यासारख्या वैरणीचे १ इंच लांबीचे तुकडे घ्यावेत. अशी कुट्टी केलेली वैरण खड्ड्यात व्यवस्थित दाबता येते.

  • खड्डा तयार झाल्यानंतर प्रथम प्लॅस्टिकचा कागद खड्ड्यात सर्व बाजू झाकतील अशाप्रकारे अंथरावा.
  • शक्‍य असल्यास २ टक्के मीठ, अर्धा टक्का युरिया, १० टक्के उसाची मळी किंवा गुळाचे पाणी यांचे मिश्रण तयार करावे. थर झाल्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा फवारा मारावा व थर चांगला दाबून घ्यावा.
  • खड्ड्यात कुट्टी भरताना चार इंच उंचीचा थर झाल्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा पुन्हा फवारा मारावा व थर चांगला दाबून घ्यावा.
  • प्रत्येक वेळेस चार इंच झाल्यावर वरीलप्रमाणे कृती करावी.
  • खड्डा पूर्ण भरल्यानंतर दोन ते तीन दिवस बंद करू नये. यामुळे चाऱ्याच्या कुट्टीमध्ये असणारी सर्व हवा निघून जाईल व मूरघास खराब होणार नाही.
  • दुसरा प्लॅस्टिकचा कागद घेऊन कुट्टीने भरलेला खड्डा पूर्णपणे झाकून घ्यावा. खालच्या कागदाच्या व वरच्या कागदाच्या कडा एकत्र करून गुंडाळावे.
  • खड्ड्यापासून पाऊण ते एक फुटाच्या अंतरावर सहा इंच खोलीची एक चारही बाजूंनी पन्हाळ खोदून कागदाच्या कडा त्यात गाडून टाकाव्यात.
  • या प्लॅस्टिकच्या कागदावर उपलब्ध असणारा पालापाचोळा किंवा उसाचे पाचट टाकावे. नंतर त्यावर माती टाकून पूर्णपणे बंद करावे. तीन महिन्यांनंतर खड्ड्यामध्ये असणाऱ्या चाऱ्यावर आंबण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • तीन महिन्यांनंतर मूरघासाचा वापर करताना खड्डा एका बाजूने उघडावा. जर मूरघास काळा पडला असेल, तर तो भाग काढून टाकावा. नंतर नियोजन केल्याप्रमाणे मूरघास म्हशींना खाऊ घालावा.
  • चांगला मूरघास कसा ओळखावा

  • उत्तम प्रतीचा मूरघास हिरव्या रंगाचा असून, त्याचा आंबट गोड वास येतो.
  • असा मूरघास म्हशी आवडीने खातात.
  • उत्तम प्रतीचा मूरघास बनविण्यासाठी बऱ्याच वेळा मका, कडवळ, ज्वारी, बाजरी व उसाचे वाढे याचबरोबर पूरक पदार्थ वापरावेत. खड्डा भरताना कुट्टीबरोबर प्रतिटन ५ किलो युरिया, ८० ते १०० किलो मळी व तीन किलो मीठ वापरल्यास उत्तम प्रतीचा मूरघास तयार होतो.
  • संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ (स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com