प्रचलित उत्पादन पद्धतीने कृषी पर्यावरण धोक्यात

जगाला पौष्टिक आणि निरोगी अन्नासाठी शाश्वत अन्न पद्धतीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उत्पादन घेताना मृदा, पाणी आणि जंगल यांचे संवर्धन करणेही गरजचे आहे - जोझ ग्रॅझिआनो डा सिल्वा, महासंचालक, अन्न आणि कृषी संघटना,संयुक्त राष्ट्रसंघ
शेती
शेती

रोम, इटली ः सध्या वाढती अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी जगात जी उत्पादन पद्धती वापरली जात आहे, त्यामुळे कृषी पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचा परिणाम मृदा, जंगल, पाणी, हवा आणि जैवविविधतेवर होत असून, जमीन आणि पर्यावरण धोक्यात येत आहे, असा सूर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मुख्यालयात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यावरण परिसंवादात निघाला.  ‘‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने कृषी पर्यावरणाला पूरक अशी उत्पादन पद्धती सोडून माती व पृथ्वीला विनाशाकडे नेणारी पद्धती आत्मसात केली आहे. मृदा आरोग्य वाढविणारी आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणाऱ्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. ज्यामुळे सध्या चर्चेला येणारा अन्न सुरक्षेचा प्रश्न याद्वारे सोडविला जाऊ शकतो. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी जगभरातील देश हे रसायनांचा अतिवापर करत आहेत. या पद्धतीमुळे उत्पादन वाढले, मात्र माती आणि पृथ्वीला मोठा फटका बसला,’’ असे अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक जोझ ग्रॅझिआनो डा सिल्वा म्हणाले.  ते पुढे म्हणाले, की जगाची भूक भागविण्यासाठी मृदा, जंगले, पाणी, हवा गुणवत्ता व जैवविविधतेचा समतोल सतत बिघडवून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यात अजूनही पूर्ण यश आले नाही. संघटनेच्या २०१८ च्या अहवालानुसार ५१ देशांतील १२४ दशलक्ष लोक अाजही अन्नधान्य असुरक्षेच्या तीव्र पातळीवर आहेत. म्हणजेच या लोकांना अन्नाचा मोठा तुटवडा आहे. २०१६ मध्ये या गटात १०८ दशलक्ष लोकांचा समावेश होता. म्हणजेच आपण उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असलो तरी अन्न सुरक्षा साध्य झाली नाही.  एफएओचे आफ्रिकेचे सहायक महासंचालक बुकार तिजाणी म्हणाले, की आफ्रिकेत हवामान बदल आणि दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात झालेली घट यामुळे फेब्रुवारी २०१८ मध्ये २२४ दशलक्ष लोक हे कुपोषणाच्या छायेत होते. आंध्र प्रदेशच्या कृषी सल्लागार मंडळाचे सदस्य विजय कुमार म्हणाले, की राज्य सरकार शेतकऱ्यांना कृषी पर्यावरण पोषक शेतीसाठी प्रोत्साहित करत आहे. सध्याच्या उत्पादन पद्धतीने आपल्याला सधनऐवजी पर्यावरण निर्धन केले आहे. सध्या भारताला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या लाटेने ग्रासले आहे. देशात उत्पादन वाढीलाच प्राधन्य न देता शेतकरी हितालाही प्राधान्य द्यावे लागेल. तज्ज्ञांनी मांडलेले मुद्दे

  •  ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने कृषी पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती सोडली.
  •  रसायनयुक्त उत्पादन पद्धतीमुळे मृदा आरोग्य धोक्यात.
  •  मृदा, जंगले, पाणी, हवा गुणवत्ता व जैवविविधतेचा समतोल बिघडला.
  •  मातीच्या आरोग्याचा विचार न करता केवळ उत्पादनावर भर.
  •  जागतिक अन्नसुरक्षा अजूनही धोक्यातच.
  •  फेब्रुवारी २०१८ मध्ये १२४ दशलक्ष लोक कुपोषणाच्या छायेत.
  •  कृषी पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अवलंब गरजेचा.
  • प्रतिक्रिया आंध्र प्रदेशातील ६० लाख म्हणजेच ८० टक्के शेतकऱ्यांना कृषी पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहित करत आहे. यामुळे राज्याती मृदा आणि पर्यावरण शाश्वत राहील. - विजय कुमार, कृषी सल्लागार मंडळाचे सदस्य, आंध्र प्रदेश  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com